
मुंबई : मध्य चीनमध्ये एका महिलेने १४ दशलक्ष युआन (२ दशलक्ष अमेरिकन डॉलर) देऊन तब्बल १९६ पार्किंग स्पॉट्स खरेदी केले. आता ती हेच स्पॉट्स मोठ्या नफ्याने विकण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे स्थानिक रहिवासी चांगलेच भडकले आहेत. तिने सोसायटीतील एकूण पार्किंगपैकी ४० टक्के जागा एकटीनेच विकत घेतली. त्यामुळे स्वस्त पार्किंग शोधणाऱ्या रहिवाशांना आता कायदेशीर लढाई लढावी लागत आहे.
हा सगळा वाद हुनान प्रांतातील चांगशा येथील एका निवासी संकुलात सुरू आहे. या सोसायटीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. २०१८ मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन विक्रीसाठी खुला झाला होता. पण सुरुवातीला तिथे दुकाने, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा नव्हत्या. त्यामुळे घर घेणाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती.
हुनान टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी इथले फ्लॅट्स आणि पार्किंग स्पॉट्स घेण्यास कोणीही उत्सुक नव्हते. मागणी नसतानाही 'वू' नावाच्या एका महिलेने यात गुंतवणुकीची मोठी संधी शोधली. तिने एकाच झटक्यात १४ दशलक्ष युआन मोजून १९६ पार्किंग स्पॉट्स खरेदी केले. पैशांची चणचण असल्याने बिल्डरनेही हा मोठा व्यवहार लगेच मान्य केला. स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या विकास आराखड्याचा अभ्यास करूनच वू हिने ही धाडसी गुंतवणूक केल्याचे बोलले जाते.
या परिसराचे पुढे काय होणार, याबाबत इतर लोक साशंक होते. पण वू हिला खात्री होती की या भागाचा नक्कीच विकास होईल. तिचा हा अंदाज खरा ठरला. या परिसराचा वेगाने विकास झाला, सोसायटीतील सगळे फ्लॅट्स हातोहात विकले गेले आणि साहजिकच पार्किंगच्या जागेची मागणीही वाढली.
पार्किंगची टंचाई निर्माण होऊ लागल्याने वू हिने आपल्या जागेवर पार्किंग लॉक बसवले. जेणेकरून तिच्या परवानगीशिवाय कोणीही तिथे गाडी लावू शकणार नाही. त्यानंतर तिने काही स्पॉट्स दरमहा ५०० युआन (७५ अमेरिकन डॉलर) भाड्याने देण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये बिल्डरने ठरवलेल्या भाड्यापेक्षा ही रक्कम दुप्पट होती.
रहिवाशांनी तिला हे भाडे ३०० युआनपर्यंत कमी करण्याची विनंती केली, पण वू हिने स्पष्ट नकार दिला. नंतर तिने हे पार्किंग स्पॉट्स प्रत्येकी १ लाख युआन (१५,००० अमेरिकन डॉलर) या दराने विक्रीला काढले. मूळ किमतीपेक्षा हा दर तब्बल ८० टक्के जास्त होता. या वाढीव किमतींमुळे रहिवाशांचा राग आणखीनच अनावर झाला. हे स्पॉट्स जुन्याच दराने विकले जावेत, अशी त्यांची मागणी होती.
पार्किंग मिळणे कठीण झाल्याने वू हिच्या या गुंतवणुकीचे रूपांतर एका मोठ्या वादात झाले. टंचाईचा फायदा घेऊन ती नफा कमवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. हा वाद मिटवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्यालाही पाठवण्यात आले होते. पण या मध्यस्थीतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर काही रहिवाशांनी एकत्र येत वू हिच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.
पार्किंगची जागा हा निवासी पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नफा कमवण्यासाठी एकाच व्यक्तीने त्यावर मक्तेदारी प्रस्थापित करू नये, असा युक्तिवाद रहिवाशांनी केला. वू आणि बिल्डर यांच्यातील खरेदी करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. पण फेब्रुवारी २०२४ मध्ये चांगशा येथील स्थानिक न्यायालयाने वू हिच्या बाजूने निकाल दिला आणि रहिवाशांना मोठा धक्का बसला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा बिल्डरने सुरुवातीला पार्किंग स्पॉट्स विक्रीसाठी काढले होते, तेव्हा रहिवाशांना ते खरेदी करण्याची संधी होती. पण त्यांनी तो अधिकार वापरला नाही. दुसरीकडे, जेव्हा मागणी कमी होती, तेव्हा वू हिने पैशांची जुळवाजुळव करून जोखीम पत्करली आणि गुंतवणूक केली.
त्यामुळे न्यायालयाने तिची ही घाऊक खरेदी कायदेशीर ठरवली. तसेच, एखादी व्यक्ती किती पार्किंग स्पॉट्स खरेदी करू शकते, यावर कोणताही कायदेशीर निर्बंध नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
या निकालामुळे वू हिला तिची गुंतवणूक कायम ठेवण्याचा अधिकार मिळाला. पण दुसरीकडे, वाढता खर्च आणि पार्किंगची अपुरी जागा यामुळे सोसायटीतील रहिवाशांमधील असंतोष मात्र वाढतच आहे.