
चीनच्या शांक्सी प्रांतात एका संतापलेल्या व्यक्तीने चक्क सरकारी कार्यालयात जेसीबी घुसवला. त्याने इमारतीच्या प्रवेशद्वाराची जोरदार तोडफोड केली. ही धक्कादायक घटना ९ नोव्हेंबर रोजी शीआनच्या शिक्सिअन न्यू एरियातील फेंगडोंग न्यू सिटी गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटरमध्ये घडली. हा सर्व थरार जवळपास एक तास सुरू होता.
या प्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. या हल्ल्यानंतर तात्काळ कर्मचाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने चिनी मीडियाला दिली.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात वायव्य चीनमधील शांक्सी प्रांतातील फेंगडोंग न्यू सिटीच्या सरकारी प्रशासकीय इमारतीचे नुकसान होताना दिसत आहे. या जेसीबीने बिल्डिंग १ च्या पायऱ्या, मुख्य साईनबोर्ड आणि काचेचे दरवाजे फोडून मोठे नुकसान केले.
या हल्ल्यात इमारतीच्या किमान सहा भागांचे नुकसान झाले आहे.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक प्रचंड घाबरले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने स्थानिक माध्यमांना सांगितले. एवढे मोठे नुकसान होऊनही काही सर्व्हिस काउंटर दुपारी पुन्हा सुरू करण्यात आले.
अल जझीराच्या वृत्तानुसार, घरे पाडल्या गेलेल्या गावकऱ्यांना भरपाई न मिळाल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप या कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.