
China Finds 85 Billion Dollar Gold Treasure : कर्नाटकात सध्या लक्कुंडीच्या खजिन्याची मोठी चर्चा आहे. दिवसेंदिवस याला नवनवीन वळण मिळत आहे. यामुळे लोकांची उत्सुकता वाढत असून, एक अज्ञात गाव आता संपूर्ण भारतात चर्चेत आले आहे. अचानक येथील जमिनीच्या किमतीही वाढल्या असून, येथे सापडलेले शिलालेख आणि खजिन्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
ही तर झाली कर्नाटकातील गोष्ट, पण यानंतर 85 अब्ज डॉलर किमतीचा 1 हजार टन सोन्याचा खजिना सापडल्याने आणि परग्रहावरील धातू सापडल्याच्या घटनेने संपूर्ण जगाला चकित केले आहे. हा खजिना मध्य चीनच्या हुनान प्रांतातील पिंगजियांग काउंटीमधील वांगवू येथे सापडला आहे. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा सोन्याचा साठा असल्याचे म्हटले जात आहे. याची अंदाजे किंमत 85.9 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही, तर भूगर्भशास्त्रज्ञांना 6,562 फूट खोलीवर 300 टनांपेक्षा जास्त सोन्याचे साठे सापडले आहेत. यामध्ये 40 सोन्याच्या नळ्यांचाही समावेश असल्याने इतिहासावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, परग्रहावरील धातूंसारख्या वस्तू सापडल्याने आणखी आश्चर्य वाढले आहे. आयबेरियन कांस्ययुगातील चमकदार सोन्याच्या खजिन्याच्या संग्रहात काही गंजलेल्या वस्तू सापडल्या आहेत. या वस्तू पृथ्वीवरील नसून परग्रहावरून आलेल्या आहेत, असे समोर आले आहे. संशोधकांना सोन्याने मढवलेली बांगडी आणि गंजलेले पोकळ अर्धगोल असलेले दागिने सापडले आहेत. हे धातू जमिनीखालून आलेले नसून आकाशातून पडलेले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
स्पेनच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयातील निवृत्त संरक्षण प्रमुख साल्वाडोर रोविरा-लोरेन्स यांच्या नेतृत्वाखालील शोध पथक याचा अभ्यास करत आहे. एकूणच, या पृथ्वीने आपल्या पोटात अनेक विचित्र गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. जितके खोदले जाईल, तितके लोकांच्या कल्पनेपलीकडचे निसर्गाचे चमत्कार लोकांना आश्चर्यचकित करत आहेत. आपणच सर्वज्ञ आहोत, असा गर्व बाळगणाऱ्या माणसाला ही निसर्गशक्ती खुजे ठरवत आहे, हे खोटे नाही.