२००६ पासून जर्मनीत राहणाऱ्या सौदी नागरिकाने कार चालवली होती. अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
बर्लिन: जर्मनीतील क्रिसमस बाजारात गर्दीत एका ५० वर्षीय सौदी नागरिकाने भरधाव वेगाने कार घुसवली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला. ६८ जण जखमी झाले असून त्यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
बर्लिनपासून १३० किमी अंतरावर असलेल्या पूर्व जर्मनीतील मॅगडेबर्ग शहरात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. गर्दीत घुसलेली काळी बीएमडब्ल्यू कार एका पन्नास वर्षीय सौदी नागरिकाने चालवली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्युनिकमध्ये नोंदणीकृत असलेली ही कार त्याने भाड्याने घेतली होती. सौदी नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप हल्ल्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही.
कार चालवणारा सौदी डॉक्टर २००६ पासून जर्मनीत राहत आहे. तो एकटाच होता आणि इतरत्र कोणताही धोका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. गर्दीत घुसलेली कार ४०० मीटर अंतरापर्यंत लोकांना धडकत पुढे गेली. सध्या या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.