
Buddha Air Plane With 55 People Skids Off Runway In Nepal : नेपाळमधील भद्रपूर विमानतळावर आज लँडिंग दरम्यान बुद्धा एअरचे एक टर्बोप्रॉप प्रवासी विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने, या अपघातात विमानातील सर्व ५१ प्रवासी आणि चालक दलाचे ४ सदस्य सुरक्षित असल्याचे एअरलाईनने स्पष्ट केले आहे. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून भद्रपूरला आले होते.
विमान ट्रॅकर्सच्या माहितीनुसार, या विमानाचा क्रमांक 9N-AMF असून ते ATR 72-500 मॉडेलचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून सुमारे २०० मीटर पुढे गेले आणि एका ओढ्याजवळ जाऊन थांबले. या घटनेत विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच काठमांडू येथून तांत्रिक आणि मदत पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे नेपाळमधील विमान वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नेपाळचा विमान सुरक्षेचा रेकॉर्ड वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये 'सौर्य एअरलाईन्स'चे बॉम्बार्डियर CRJ200LR विमान काठमांडू येथून उड्डाण केल्यानंतर कोसळले होते, ज्यामध्ये १९ पैकी १८ जणांचा मृत्यू झाला होता.
तसेच, जानेवारी २०२३ मध्ये 'येती एअरलाईन्स'चे एटीआर ७२ विमान पोखरा येथे लँडिंग करताना कोसळले होते. त्या भीषण अपघातात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी अशा एकूण ७२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तांत्रिक तपासणीत असे समोर आले होते की, वैमानिकाने चुकून इंजिन 'फेदर' केल्यामुळे विमानाची गती मंदावली आणि ते कोसळले.
आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वारंवार होणाऱ्या या विमान अपघातांमुळे नेपाळी हवाई क्षेत्रातील तांत्रिक आणि मानवी त्रुटींचा प्रश्न गंभीर बनला आहे.