
China Develops Boneless Fish : मासे खाताना लहान काटे घशात अडकण्याचा धोका टाळण्यासाठी चीनने बिनकाट्याचा मासा विकसित केला आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर चीनने कार्प जातीचा बिनकाट्याचा मासा तयार केला आहे. चीनने जिबेल कार्प जातीचा मासा विकसित केला आहे. कार्प मासा हा चीनमधील गोड्या पाण्यातील एक मुबलक प्रमाणात आढळणारा मासा आहे. पण हा मासा शिजवून खाताना त्यातील लहान काटे हे एक मोठे आव्हान ठरतात. इंटरमस्क्युलर बोन्स नावाचे लहान काटे कार्प मासे खाताना धोका निर्माण करतात. यावर उपाय म्हणून चीनने जनुकीय बदलाद्वारे लहान काटे नसलेला कार्प मासा तयार केला आहे. चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सने या शोधाबद्दल माहिती दिली आहे. प्रसिद्ध संशोधक गुई जियानफांग यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने 'सोंगके नंबर 6' नावाचा कार्प मासा तयार केला आहे. लहान काट्यांच्या वाढीस कारणीभूत असलेल्या जनुकामध्ये बदल करून चीनने हे यश मिळवले आहे. यासाठी संशोधकांनी प्रथम माशांमध्ये 'Y' अक्षरासारख्या काट्यांच्या वाढीस कारणीभूत असलेले जनुक ओळखले. अत्यंत गुंतागुंतीच्या जनुकीय मॅपिंगद्वारे RUNX2b नावाचे जनुक ओळखण्यात आले.
पुढील टप्प्यात भ्रूणावस्थेतच माशांमधील या जनुकाची वाढ थांबवण्यात आली. यामुळे माशाचा मुख्य सांगाडा सामान्यपणे वाढला आणि इंटरमस्क्युलर बोन्सची वाढ थांबली. अशाप्रकारे, अत्यंत बारीक काटे नसलेला नवीन कार्प मासा जन्माला आला, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. सामान्य कार्प माशांमध्ये 80 पेक्षा जास्त लहान काटे आढळतात. काळजीपूर्वक न खाल्ल्यास ते घशात अडकून त्रास होणे सामान्य आहे.
चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सचा दावा आहे की, नवीन प्रकारचा कार्प मासा कमी खाद्यात जास्त उत्पन्न देईल. 'सोंगके नंबर 6' ची निर्मिती चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सने व्यावसायिक उत्पादनाच्या उद्देशाने केली आहे. जनुकीय शोधांद्वारे अन्नसुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सच्या 'प्रिसिजन सीड डिझाइन अँड क्रिएशन' या प्रकल्पाचा भाग म्हणून 6 वर्षांच्या दीर्घ संशोधनानंतर चीनने हे यश मिळवले आहे. चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्स आता खवय्यांच्या आवडत्या इतर गोड्या पाण्यातील माशांवरही असेच प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.
तैवानमधील शास्त्रज्ञांनी जेलिफिशमध्ये आढळणारे जिन्स वापरुन नवीन कार्प मासा जन्मायला घातला आहे. तो पाण्यात जेलिफिशप्रमाणे चमकतो. भविष्यात असेच काही आणखी बदल करण्यात येणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्याचा फायदा हा मासा शोधण्यासाठी होणार आहे. तसेच त्याचे इतरही काही महत्त्वपूर्ण फायदे आहेत.