
केंब्रिज या ऐतिहासिक शहराची ओळख करून देताना एका ब्रिटिश टूर गाईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो इंग्रजी आणि हिंदीमध्ये अगदी लीलया संवाद साधताना दिसतोय. भारतापासून हजारो मैल दूर, चक्क एका ब्रिटिश माणसाला हिंदीत बोलताना पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. त्याची भाषेवर असलेली पकड आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ पाहून भारतीय नेटकरी त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
जे ढोलकिया यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. यात 'स्कुडामोर' या केंब्रिजमधील रिव्हर टूर कंपनीसाठी काम करणारा जॉनी नावाचा गाईड दिसत आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या प्रसिद्ध वास्तूंची माहिती देताना तो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांचा अगदी सहजपणे वापर करतो. त्याचा हा अस्सल अंदाज पाहून सगळेच थक्क झालेत.
व्हिडिओमध्ये जॉनी स्वतःची ओळख करून देतो. त्यांच्या कंपनीची ४५ मिनिटांची टूर असते, ज्यात केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या आठ कॉलेजेसची सैर घडवली जाते, असं तो सांगतो. 'स्कुडामोर' ही शहरातील सर्वात जुनी रिव्हर टूर कंपनी असून तिची स्थापना १९१० मध्ये झाल्याची माहितीही तो देतो. पर्यटकांना ते कसा भारी अनुभव देतात, हेही तो पटवून सांगतो.
या टूरमध्ये सर्वात भारी गोष्ट म्हणजे जॉनी ज्या पद्धतीने इंग्रजी आणि हिंदीत स्विच करतो ती! दोन्ही भाषांमधील त्याचा संवाद लोकांचं, विशेषत: यूकेमध्ये फिरताना हिंदी ऐकण्याची अजिबात अपेक्षा नसलेल्या भारतीयांचं लक्ष वेधून घेत आहे.
जॉनीचं भारताशी असलेलं नातं फक्त भाषा शिकण्यापुरतं मर्यादित नाही. त्याचा जन्म कोलकातामध्ये झाला आणि तो तिथे १२ वर्षं राहिला होता. आता तो यूकेमध्ये राहत असला तरी भारतात घालवलेल्या त्या वर्षांमुळे त्याचं इथल्या संस्कृतीशी आणि लोकांशी घट्ट नातं जोडलं गेलंय.
त्याची हिंदीवरील पकड आणि टूर दरम्यान दोन्ही भाषांमधील सहज वावर यामुळे या व्हिडिओमध्ये एक वेगळीच जवळीक जाणवते. भारतीय भाषा आणि संस्कृती कशा सीमारेषा ओलांडून लोकांना अनपेक्षितपणे एकत्र आणतात, याचीच आठवण हा व्हिडिओ अनेकांना करून देतोय.
या व्हिडिओवर युजर्सकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. जॉनीची हिंदी ऐकून अनेकांनी आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केलंय. भारतीय पर्यटकांशी कनेक्ट होण्यासाठी हिंदी बोलण्याची त्याची ही स्टाईल अनेकांना आवडली आहे.
एका युझरने कमेंट केलीय की, "१०० वर्षांपेक्षा कमी वेळात आपण इथं पोहोचलोय."
दुसऱ्या एका युझरने लिहिलंय, "UNO REVERSE."
तर तिसऱ्या युझरने म्हटलंय, "जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिंदी बोलणं हा खरंच एक भारी फंडा आहे, जो त्याने क्रॅक केलाय."
केंब्रिज टूरमधला हा साधासा संवाद आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलाय. यूकेमध्ये अशा प्रकारे अगदी अस्सल हिंदी ऐकायला मिळणं, हे भारतीय प्रेक्षकांसाठी नक्कीच भारी फिलिंग आहे.