Astronaut Sunita Williams Retires From NASA : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी तीन मोहिमांमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ६०८ दिवस राहून इतिहास घडवला आहे. सुनीता विल्यम्स नासातून निवृत्त झाल्या आहेत. जाणून घ्या…
अंतराळ क्षेत्रातील दिग्गज महिलांपैकी एक असलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अमेरिकेची अंतराळ संस्था नासातून निवृत्त झाल्या आहेत. नासामध्ये तब्बल २७ वर्षे काम केलेल्या सुनीता विल्यम्स यांनी तीन मोहिमांमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ६०८ दिवस घालवले आहेत. २००६ मध्ये सुनीता विल्यम्स यांनी पहिला ISS प्रवास केला होता. २७ डिसेंबर २०२५ रोजी सुनीता विल्यम्स अधिकृतपणे निवृत्त झाल्याचे नासाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
24
सुनीता विल्यम्स यांचे नासाने मानले आभार
मानवी अंतराळ प्रवासात सुनीता विल्यम्स एक मार्गदर्शक आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांच्या नेतृत्वाने त्यांनी संशोधनाचे भविष्य घडवले आणि लो-अर्थ ऑर्बिटमधील व्यावसायिक मोहिमांसाठी मार्ग मोकळा केला, असे नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी स्पष्ट केले. चंद्रावर होणाऱ्या आगामी आर्टेमिस मोहिमेसाठी आणि भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी पाया रचण्यात सुनीता यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा मोठा वाटा आहे. सुनीता विल्यम्स येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील, असेही आयझॅकमन म्हणाले. नासातील सेवेबद्दल जेरेड आयझॅकमन यांनी सुनीता विल्यम्स यांचे आभार मानले.
34
सुनीता विल्यम्स यांचे पहिले दोन अंतराळ प्रवास
२००६ मध्ये सुनीता विल्यम्स पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या. त्यांचा हा प्रवास STS-116 क्रूसोबत डिस्कव्हरी अंतराळयानातून झाला होता. पहिल्या अंतराळ मोहिमेत सुनीता विल्यम्स यांच्यावर फ्लाईट इंजिनिअरची जबाबदारी होती. २०२१ मध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकासाठी पुढचा प्रवास केला. कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम प्रक्षेपण केंद्रातून एक्सपिडिशन ३२/३२ टीमसोबत त्यांनी प्रवास केला. या मोहिमेत सुनीता यांनी १२७ दिवस ISS मध्ये घालवले. एक्सपिडिशन ३३ टीमसोबत सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशन कमांडरही होत्या.
जून २०२४ मध्ये नासाच्या बोइंग क्रू फ्लाईट टेस्ट मिशनचा भाग म्हणून सुनीता विल्यम्स यांनी तिसरा अंतराळ प्रवास केला. हा प्रवास फक्त आठ दिवसांसाठी नियोजित होता. सुनीता विल्यम्स यांच्यासोबत बुच विल्मोर हेदेखील या मोहिमेत होते. बोइंग स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबला. त्यामुळे सुनीता आणि बुच यांनी ९ महिने अंतराळ स्थानकात घालवले. मार्च २०२५ मध्ये ही मोहीम पूर्ण करून सुनीता विल्यम्स स्पेसएक्स क्रू-९ टीमसोबत पृथ्वीवर परतल्या.