
नवी दिल्ली: एका वीर्यदात्याने आपल्या १९ मुलांना भेट दिल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परदेशात वीर्यदान हा एक व्यवसाय बनला आहे. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये पुरुष वीर्यदाता असल्याचे अभिमानाने सांगतात. समाजात वीर्यदात्यांना आदराने पाहिले जाते. वीर्यदानासाठी त्यांना काही मोबदला मिळतो. भविष्यात जन्मणाऱ्या मुलांशी आणि वीर्यदात्याशी कोणतेही नाते नसते. मुले १८ वर्षांची झाल्यावर आपल्या जैविक वडिलांना भेटू शकतात. आता एका वीर्यदात्याने एकाच वेळी आपल्या १९ मुलांना भेट दिली आहे.
लॉस एंजेलिसमधील रहिवासी मायकेल रुबिनो यांनी आपल्या १९ मुलांना पहिल्यांदाच भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुबिनो यांनी यापूर्वी कधीही आपल्या मुलांना भेट दिलेली नव्हती. मायकेल रुबिनो यांची सर्व मुले १६ ते २१ वयोगटातील आहेत. १९ पैकी ११ मुलांचे डोळे रुबिनो यांच्यासारखेच निळे आहेत. १९ मुलांसह मायकेल रुबिनो यांची मुलाखत यूट्यूबवर १० दशलक्ष व्ह्यूज मिळवली आहे.
मायकेल रुबिनो वीर्यदाता का झाले?
मायकेल रुबिनो हे एक चांगले चित्रकार आहेत आणि सुंदर पेंटिंग्ज करतात. ३० व्या वर्षी मायकेल रुबिनो वीर्यदाता झाले. वीर्यदान हे एक चांगले काम आहे, ज्यामुळे अनेकांना आपला वंश वाढवण्यास मदत होते. म्हणूनच मी वीर्यदाता झालो, असे मायकेल रुबिनो सांगतात.
सर्वसाधारणपणे, वीर्यदाते आपले नाव कुठेही उघड करत नाहीत. ज्यांना त्यांनी वीर्यदान केले आहे त्यांनाही भेटायचे नसते. तसेच त्यांना आपली माहिती देत नाहीत. पण मायकेल रुबिनो वीर्यदान बँकेत आपले नाव नोंदवत असत. भविष्यात एक-दोन जणांना भेटता येईल म्हणून मायकेल रुबिनो आपले नाव आणि तपशील नोंदींमध्ये लिहीत असत.
१९ मुलांसाठी मेजवानी
काही वर्षांनंतर मायकेल रुबिनो यांच्या पत्त्यावर पत्रे येऊ लागली. ही पत्रे लिहिणाऱ्यांनी मायकेल रुबिनो यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून मायकेल रुबिनो यांनी एकाच दिवशी सर्व १९ मुलांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना घरी बोलावले. एकाच दिवशी आपल्या १९ मुलांना पाहून मायकेल रुबिनो यांनी आनंद व्यक्त केला. घरी मुलांसाठी मायकेल रुबिनो यांनी खास मेजवानीचेही आयोजन केले होते. सर्व मुलांसह मायकेल रुबिनो यांनी फिरून चांगला वेळ घालवला.
वडिलांना पाहून आनंद झाला
मुलाखतीत बोलताना एका तरुणीने सांगितले की, मला माझ्या जैविक वडिलांना भेटायचे होते. आता ते पूर्ण झाल्याने मला आनंद झाला आहे. आम्ही १९ भावंडे आहोत हे सांगायला आनंद होतो. १९ जणांमध्ये अनेक साम्य आहेत. काही जण मायकेल रुबिनो यांना माइक तर काही जण डॅड म्हणतात. मला आधीच वडील असल्याने मी त्यांना माइक म्हणते, असे तिने सांगितले.
मायकेल रुबिनो म्हणाले की, मुलांना पाहून आनंद झाला. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. मी १९ मुलांचा बाप आहे. माझे घर आता लहान झाले आहे, असे म्हणत ते हसले. २०१७ मध्ये मायकेल रुबिनो आणि त्यांच्या मुलांच्या मुलाखतीचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.