
चीनच्या शांघाय शहरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय महिलेने ब्युटी ट्रीटमेंटच्या नादात आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. या आजींनी तब्बल ३ दशलक्ष युआन (सुमारे ४ लाख ५० हजार डॉलर्स) पार्लरमध्ये खर्च केले. आता त्यांच्याकडे घरभाडे द्यायलाही पैसे नाहीत. 'यू' (Yu) असं या आजींचं नाव असून, २०१६ पासून त्या 'योंगकी ब्युटी अँड हेअरड्रेसिंग कंपनी' (Yongqi Beauty and Hairdressing Company) आणि त्यांच्याशी संबंधित एका मेडिकल ब्युटी क्लिनिकमध्ये जात होत्या.
आईने आपले सगळे पैसे पार्लरमध्ये उडवल्याचं जेव्हा मुलीला समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थेट शांघायमधील एका टीव्ही चॅनेलकडे धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली.
मुलीने मिळवलेल्या बिलांनुसार, यू यांनी गेल्या काही वर्षांत स्किन-टायटनिंग, थ्रेड लिफ्टिंग आणि मेरिडियन मसाज यांसारख्या अनेक महागड्या ट्रीटमेंट्स घेतल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांनी आयब्रो आणि लिप टॅटूसाठीही लाखो रुपये मोजले.
धक्कादायक बाब म्हणजे, या पार्लरने मार्केट रेटपेक्षा १० ते २० पट जास्त पैसे आजींकडून उकळले होते.
उदाहरणच द्यायचं झालं तर, लिप टॅटूच्या एका सेशनसाठी त्यांनी ३९,८०० युआन (सुमारे ६,००० डॉलर्स) आकारले. बिलांवरून असंही दिसतंय की, गरज नसतानाही यू यांच्यावर हीच ट्रीटमेंट अनेकदा करण्यात आली.
एवढे पैसे का खर्च केले, असं जेव्हा यू यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्या म्हणाल्या की, "माझ्याकडे खूप पैसा आहे, त्यामुळे मी बिलांकडे फारसं लक्ष दिलं नाही."
यू यांनी आपलं घर विकून हे पैसे जमा केले होते. पण मुलीला जेव्हा या खर्चाची माहिती मिळाली, तोपर्यंत यू यांची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली होती की त्यांना स्वतःचे दागिनेही विकावे लागले.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा योंगकीच्या कर्मचाऱ्यांनी यू यांना 'रुई' (Rouyi) नावाच्या एका मेडिकल ब्युटी क्लिनिकमध्ये पाठवलं.
या क्लिनिकने 'इंटिमेट केअर' ट्रीटमेंटच्या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल ३ लाख युआन (सुमारे ४५,००० डॉलर्स) उकळले. यू यांनी एवढी मोठी रक्कम भरली खरी, पण त्यांच्यावर ती ट्रीटमेंट कधी झालीच नाही. त्याऐवजी क्लिनिकने त्यांना इतर काही स्किनकेअर ट्रीटमेंट्स दिल्या.
रुई क्लिनिकच्या बिलांवर 'हॅपीनेस चेअर' आणि 'स्पेस कॅप्सूल' असे विचित्र उल्लेख होते, ज्याचा अर्थ स्वतः यू यांनाही सांगता आला नाही.
'एससीएमपी'ने (SCMP) यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी रुई क्लिनिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण बिलावर दिलेले फोन नंबर बंद होते.
यू यांच्या मुलीला असंही आढळलं की, या क्लिनिकने तिच्या आईचं बिल योंगकीच्या अकाउंटवरून काढलं होतं, ज्यामुळे या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण झाला आहे.
योंगकीच्या एका कर्मचाऱ्याने मात्र असा दावा केला की, यू यांना स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप चिंता (Appearance anxiety) होती, त्यामुळे त्यांनी स्वतःहून या ट्रीटमेंट्स मागितल्या होत्या.
कर्मचाऱ्याने असंही सांगितलं की, दुकानात किमती स्पष्टपणे लावलेल्या होत्या आणि यू यांनी स्वतःच्या मर्जीने पैसे भरले.
अखेर तडजोड म्हणून योंगकी पार्लरने यू यांनी भरलेल्या ॲडव्हान्स रकमेपैकी काही भाग परत केला.
एससीएमपीने पार्लरच्या मॅनेजमेंटशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी हे प्रकरण मिटल्याचं सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
यू यांनी याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. योंगकीचं हे पार्लर आजही सुरू असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्याचं वृत्त नाही.
मात्र, या प्रकरणामुळे ब्युटी इंडस्ट्रीमधील मनमानी कारभार आणि वृद्ध ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पार्लरने 'किमती स्पष्टपणे लावल्याचा' बचाव केला असला तरी, चीनच्या 'प्रोव्हिजन्स ऑन क्लिअर प्राइस मार्केटिंग अँड प्रोहिबिशन ऑफ प्राइस फ्रॉड' कायद्यानुसार व्यवसायांनी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा पाळणं बंधनकारक आहे.