
एका ५९ वर्षीय ब्रिटिश टीव्ही प्रेझेंटरने लाईव्ह शोमध्ये आपण गरोदर असल्याची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. डॉ. रेनी हेंडरकॅम्प या जनरल प्रॅक्टिशनर असून, जीबी न्यूजच्या (GB News) 'द सॅटर्डे फाइव्ह' (The Saturday Five) शोमध्ये पॅनेलिस्ट आहेत. आपण १२ आठवड्यांच्या गरोदर असून, तिसऱ्या मुलाला जन्म देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पतीचे वय ६६ वर्षे आहे.
त्यांच्या या अनपेक्षित घोषणेने पॅनेलवरील इतर सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शोदरम्यान डॉ. हेंडरकॅम्प म्हणाल्या की, मला एक अशी बातमी द्यायची आहे, जी कोणालाच माहीत नाही. त्यानंतर त्यांनी आई होणार असल्याची सरप्राईज न्यूज दिली.
सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही, पण नंतर सहकाऱ्यांनी लगेच त्यांना शुभेच्छा दिल्या. एका पॅनेलिस्टने तर उठून त्यांना मिठीच मारली.
"मला पॅनेलला अशी बातमी द्यायची आहे, जी त्यांना किंवा इतर कोणालाच माहीत नाही. मी लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे," असं त्या म्हणाल्या.
‘I’m going to be a mother of 3 shortly…’
GB News contributor Dr Renee Hoenderkamp announces she is expecting a baby! https://t.co/2GYkgsqCAV
— GB News (@GBNEWS) November 14, 2026
या घोषणेनंतर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला, पण दुसरीकडे सोशल मीडियावर वादही सुरू झाला. ५९ व्या वर्षी आई होण्याच्या त्यांच्या निर्णयावर काही युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या वाढत्या वयामुळे आणि मुलाच्या भविष्यावरून लोकांनी चिंता व्यक्त केली.
डेली मेल (Daily Mail) मधील एका लेखातून डॉ. हेंडरकॅम्प यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. 'मी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आई होत आहे', या आरोपांचे त्यांनी खंडन केले. जेव्हा तरुण महिला आई होतात तेव्हा त्यांना असे प्रश्न विचारले जात नाहीत, मग वयस्कर महिलांनाच आपला निर्णय का सिद्ध करावा लागतो, असा सवाल त्यांनी विचारला.
"अनेकांनी असं म्हटलं की मी 'स्वतःसाठी' हे बाळ जन्म देत आहे. पण, मुद्दाम आई होण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येक महिलेच्या बाबतीत हेच खरं नाही का?"
"२० किंवा ३० च्या वयोगटातील महिलांना त्यांच्या आई होण्याच्या इच्छेमागे परोपकार आहे हे सिद्ध करायला आपण सांगत नाही."
"फक्त महिला वयाने मोठी आहे म्हणून तिची आई होण्याची इच्छा चुकीची कशी ठरू शकते?"
डॉ. हेंडरकॅम्प म्हणाल्या की, लोक माझ्या आरोग्याकडे आणि जीवनशैलीकडे लक्ष न देता फक्त माझ्या जन्माच्या दाखल्यावर असलेल्या वयावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्या स्वतःची खूप काळजी घेतात आणि आपल्या वयाच्या निम्म्या वयाच्या लोकांपेक्षाही त्या अधिक फिट आहेत, असे त्यांनी सांगितले.
काही टीकाकारांनी तर असंही म्हटलं की, "या मुलाला मोठं होताना बघण्यासाठी त्या जिवंत राहतील की नाही हे सांगता येत नाही."
लोकांची ही चिंता पूर्णपणे चुकीची नाही, हे मान्य करत दोन मुलांच्या आई असलेल्या डॉ. हेंडरकॅम्प म्हणाल्या की, भविष्यात आपण मुलासोबत नसण्याची शक्यता त्यांनी आधीच गृहीत धरली होती.
"ही काळजी योग्य आहे आणि मी त्याचा काळजीपूर्वक विचार केला आहे," असं त्या म्हणाल्या.
"माझी मुलगी ३० किंवा २० वर्षांची होईल तेव्हा मी जिवंत असेन असं वचन मी देऊ शकत नाही. पण तसं कुणीही देऊ शकत नाही ना? आजारपण किंवा संकट माणसाचं वय बघून येत नाही," असं त्या म्हणाल्या.
पण फक्त लवकर मृत्यू होण्याची शक्यता आहे म्हणून मुलाला एक आनंदी आणि प्रेमळ बालपण देण्याची संधी सोडून देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
"याचा अर्थ वय महत्त्वाचं नाही असं नाही. पण लवकर मृत्यू होण्याची भीती एका आनंदी, सुरक्षित आणि प्रेमळ बालपणाच्या शक्यतेपेक्षा जास्त असू शकत नाही, असं मला वाटतं."
वयस्कर पालकांबद्दल समाजाच्या असलेल्या दुटप्पीपणावरही त्यांनी ताशेरे ओढले. त्यांच्या वयावरून एवढी चर्चा झाली, पण त्यांच्या ६६ वर्षीय पतीच्या वयाकडे कुणीच लक्ष दिलं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्या म्हणाल्या की, उशिरा वडील होणाऱ्या पुरुषांवर कधीच एवढी टीका होत नाही. अनेकदा जास्त वयात वडील होणे ही अभिमानाची गोष्ट मानली जाते, कारण त्यावेळी पुरुष त्यांच्या करिअरमध्ये स्थिर झालेले असतात आणि कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकतात.
"जास्त वयात वडील होण्याला आतापर्यंत कौतुकानेच पाहिलं गेलं आहे, काही वेळा तर त्याला यश मानलं जातं," असं त्या म्हणाल्या.
“पण जेव्हा एखादी महिला ५९ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा मात्र लोकांचा संताप अनावर होतो. नक्कीच, वयस्कर आई आणि वडिलांमध्ये जैविक फरक असतो. पण जेव्हा टीका वैद्यकीय धोक्याच्या पलीकडे जाऊन स्वार्थीपणाच्या आरोपांपर्यंत पोहोचते, तेव्हा फक्त महिलांनाच जास्त लक्ष्य का केलं जातं?”