अनेक भागांमध्ये मारल्या जाणाऱ्या महिलांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, असे यूएनच्या महिला हत्या अहवालात म्हटले आहे.
जिनेव्हा: स्वतःची घरेही महिलांसाठी सुरक्षित नाहीत, हे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जगभरात होणाऱ्या महिला हत्येची धक्कादायक आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. यानुसार, दररोज जगभरात १४० महिला आणि मुलींची हत्या होते. या हत्या घरात होतात आणि हत्येचा आरोपी जवळचा नातेवाईक असतो, हे धक्कादायक तथ्य अहवालातून समोर आले आहे.
संयुक्त राष्ट्र महिला संघटनेने जाहीर केलेल्या महिला हत्येच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये जगभरात ८५,००० मुली आणि महिला पुरुषांनी मारल्या आहेत. यापैकी ६० टक्के म्हणजेच ५१,१०० महिलांची हत्या त्यांच्या जवळच्या पुरुष नातेवाईकांनी केली आहे. महिलांसाठी घर हे सर्वात धोकादायक ठिकाण बनत चालले आहे, असे अहवालात म्हटले आहे.
महिला आणि मुली सर्वात सुरक्षित असायला हव्या अशा घरातच त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो, असे संयुक्त राष्ट्र महिला संघटनेच्या उप कार्यकारी संचालक न्याराद्झाई गंबोन्झावान यांनी आकडेवारीच्या आधारे सांगितले. हे केवळ मोठ्या हिमनगाचा एक छोटासा भाग आहे, असे त्या म्हणाल्या. सर्व मृत्यूंची नोंद होत नाही आणि पोलिस आणि इतर अधिकृत आकडेवारीच्या आधारेच अहवाल तयार केला जातो. जगाच्या अनेक भागांमधून अशी आकडेवारीही उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.
२०२२ च्या तुलनेत महिला हत्येच्या प्रमाणात घट झाली असली तरी जवळच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या महिला हत्येचे प्रमाण वाढत आहे, असे अहवालात म्हटले आहे. आफ्रिकेत अशा हत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर अमेरिका आणि ओशनियाचा क्रमांक लागतो. युरोप आणि अमेरिकेत जोडीदाराकडून महिलांच्या हत्येचे प्रमाण जास्त आहे.