झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीच्या नावामागील रंजक गोष्ट सांगितली.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला हे नाव कसे मिळाले याचा कधी विचार केला आहे का? झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या कंपनीच्या नावामागील रंजक गोष्ट सांगितली आहे. दीपिंदर गोयल त्यांच्या पत्नीसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कॉमेडी शोमध्ये सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी ही गोष्ट उघड केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कपिल शर्मा यांनी दीपिंदर गोयल यांना टोमॅटो, पोटॅटो असे शब्द ऐकले आहेत, पण हे झोमॅटो काय आहे असा मिश्किल प्रश्न विचारला. या प्रश्नावर हसून दीपिंदर यांनी उत्तर दिले की, आम्हाला खरंतर 'टोमॅटो डॉट कॉम' हे नाव हवे होते, पण ते डोमेन आम्हाला मिळाले नाही, म्हणून एक अक्षर बदलून आम्ही झोमॅटो डॉट कॉम हे डोमेन घेतले. झोमॅटोचे सीईओ यांनी अतिशय विनोदी पद्धतीने हे उत्तर दिले.
त्यांच्या लग्नाबद्दलही दीपिंदर यांनी कार्यक्रमात सांगितले. मेक्सिकोच्या ग्रेशिया मुनोज यांना कसे भेटले यावर कपिल शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दीपिंदर म्हणाले की, मी अविवाहित असताना माझ्या मित्रांनी ग्रेशियाबद्दल सांगितले. ग्रेशिया पहिल्यांदा दिल्लीत आली तेव्हा एका मित्राने मला फोन करून सांगितले की, तुझ्यासाठी एक मुलगी आहे आणि तू तिला नक्की भेटायला हवं. भेटल्यानंतर तू तिला लग्न करशीलच असेही त्या मित्राने मला सांगितले. त्याचा अंदाज खरा ठरला असे हसत दीपिंदर म्हणाले.