
मुंबई : ऑनलाइन ग्रोसरी ॲप झेप्टोवरून (Zepto) छोट्या-मोठ्या वस्तू मागवणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कंपनीने फ्री डिलिव्हरीसाठीची किमान ऑर्डर रक्कम वाढवली आहे. आधी १४० रुपयांच्या खरेदीवर फ्री डिलिव्हरी मिळायची, पण आता तुम्हाला कमीत कमी १९९ रुपयांची खरेदी करावी लागेल. या बदलामुळे झेप्टो आता आपले स्पर्धक स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) आणि ब्लिंकिट (Blinkit) यांच्या पंक्तीत जाऊन बसलं आहे. कारण या प्लॅटफॉर्मवरही फ्री डिलिव्हरीसाठी साधारणपणे एवढीच अट आहे.
९९ रुपयांवरुन १९९ पर्यंत वाढवली फ्री डिलिव्हरी
गेल्या वर्षीच झेप्टोने फ्री डिलिव्हरीची मर्यादा ९९ रुपयांवरून १४९ रुपये केली होती. आता पुन्हा एकदा ही रक्कम वाढवल्यामुळे छोट्या ऑर्डर्ससाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील.
जर तुमची ऑर्डर १९९ रुपयांपेक्षा कमी असेल, तर झेप्टो तुमच्याकडून ३० रुपये डिलिव्हरी चार्ज घेणार आहे. म्हणजे, समजा तुम्ही फक्त ४९ रुपयांची एखादी वस्तू मागवली, तर तुम्हाला डिलिव्हरी फीचे ३० रुपये मिळून एकूण ७९ रुपये द्यावे लागतील. हे अतिरिक्त पैसे वाचवण्यासाठी आणि फ्री डिलिव्हरी मिळवण्यासाठी ग्राहकांना आता आपल्या कार्टमध्ये आणखी वस्तू टाकाव्या लागतील.
एवढंच नाही, तर गर्दीच्या वेळी (Peak Hours) फ्री डिलिव्हरी मिळवण्यासाठीची ही मर्यादा २९९ रुपयांपर्यंतही जाऊ शकते, असंही समजतंय.
प्रत्येक ऑर्डरमधून मिळणारा नफा वाढवणं आणि कंपनीचा तोटा कमी करणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या (Kotak Institutional Equities) रिपोर्टनुसार, आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने झेप्टोने काही निवडक शहरांमध्ये आणि पिन कोडमध्ये हा बदल लागू केला आहे.
अचानक लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी झेप्टो वापरणारा एक मोठा ग्राहकवर्ग आहे. डिलिव्हरी चार्ज टाळण्यासाठी लोक आता एकत्र जास्त खरेदी करतील, अशी शक्यता आहे. पण दुसरीकडे, या नव्या अटीमुळे फक्त छोट्या ऑर्डर्स करणारे सामान्य ग्राहक झेप्टोपासून दूरही जाऊ शकतात.