
बंगळुरू: पतीच्या मृत्यूचं दुःख संपायच्या आत, अगदी १९ दिवसांतच पत्नीने दुसरं लग्न केलं तर कोणालाही संशय येईल, नाही का? कर्नाटकमधील तुमकूरमध्ये याच संशयामुळे एका भयंकर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. ५० वर्षांच्या परमेश यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर त्यांची पत्नी आशा आणि तिचा प्रियकर यांनी मिळून त्यांचा जीव घेतला होता. धक्कादायक म्हणजे, मृत्यूची बातमी सर्वांना देण्यापासून ते मृतदेहावर रडण्याचं नाटक करण्यापर्यंत सगळं काही या आरोपींनीच केलं होतं. आता या मृत्यूमागचं गूढ उकललं असून, विश्वासाघाताचा एक अत्यंत क्रूर चेहरा समोर आला आहे.
ही घटना तुमकूरच्या दासरहल्ली येथील आहे. पोलिसांनी परमेश यांचा मृत्यू हा खून असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासाठी पुरण्यात आलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. या प्रकरणी परमेश यांची पत्नी आशा आणि तिचा प्रियकर चंद्रप्पा यांना पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रप्पाशी लग्न करण्यासाठीच आशाने हा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. परमेश यांच्या मृत्यूनंतर अवघ्या १९ दिवसांत आशाने चंद्रप्पाशी लग्न केल्यामुळे तिची नणंद नंदीता यांना संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.
परमेश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं आशा सांगत होती, पण त्यावर आपला विश्वास नसल्याचं सांगत नंदीता यांनी चौकशीची मागणी केली. यानंतर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि पुन्हा पोस्टमॉर्टम केलं. या रिपोर्टमधून स्पष्ट झालं की, परमेश यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाला होता. चंद्रप्पा सोबतच्या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने, दोघांनी मिळून उशीने तोंड दाबून परमेश यांची हत्या केली. मात्र, आशाने नातेवाईक आणि गावकऱ्यांना परमेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिने चंद्रप्पाशी लग्न केलं. विशेष म्हणजे, केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या आशाने याआधी परमेश यांना घटस्फोट दिला होता आणि नंतर पुन्हा त्यांच्याशीच लग्न केलं होतं. तिचा प्रियकर चंद्रप्पा हा कुनिगलचा रहिवासी आहे.