Published : Jul 22, 2025, 06:57 PM ISTUpdated : Jul 26, 2025, 06:06 PM IST
मुंबई - श्रावण २५ जुलैपासून सुरु होतोय. असा प्रश्न अनेकदा पडतो की, श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा लागतो? केवळ धार्मिक कारणास्तव का? की त्यामागे शास्त्रीय आधारही आहे? आज वडिलोपार्जित परंपरेला शास्त्र आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया.
श्रावण महिना, ज्याला सावन मास असेही म्हणतात, आला की श्रद्धेचे, भक्तीचे आणि सात्विकतेचे वातावरण निर्माण होते. यंदा मराठी श्रावण २५ जुलैपासून सुरु होतोय. हा महिना विशेषतः शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. याच काळात कुट्टूच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, वडे, उपवास चिवडा यांसारखे उपवासाचे पारंपरिक पदार्थ घराघरात बनवले जातात. या महिन्यात मांसाहार फक्त टाळलाच जात नाही तर त्याचा विचार करणेसुद्धा चुकीचे मानले जाते.
28
हिंदू धर्मानुसार कारणं काय?
हिंदू धर्मात मांसाहार हा संमतीने निषिद्ध मानला जातो. मात्र, अनेक जण नियमित मांसाहार करत असतात. परंतु श्रावण महिन्यात मात्र मांसाहार पूर्णतः टाळावा, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. त्यामागे श्रद्धा, संयम, आणि आत्मिक शुद्धीचा उद्देश आहे.
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात:
"जे कोणी मला प्रेमाने पत्र (पान), फुल, फळ वा पाणी अर्पण करतात, ते मी स्वीकारतो." या वाक्यातून शुद्ध शाकाहाराच्या जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच वेद, पुराणे आणि महाभारतातही मांसाहाराला नकार दिला आहे. शिवाय, श्रावण महिन्यात अनेक पवित्र सण येतात, जसे की कृष्ण जन्माष्टमी, रक्षा बंधन, नाग पंचमी, हरितालिका तीज. या सर्व सणांचा उद्देशही शुद्धतेशी निगडित असल्याने, मांसाहार टाळणे अपेक्षित आहे.
38
वैज्ञानिक कारणं काय?
श्रावण महिना बहुधा पावसाळ्याच्या मध्यात येतो आणि त्या काळात हवामानात आर्द्रता अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती मंदावते. शरीर हलका आहार स्वीकारतो, म्हणूनच लोक उपवासात साबुदाणा, फळे, बटाट्याचे पदार्थ, दूध वगैरे खातात. हे सर्व पदार्थ सहज पचणारे असतात.
पावसामुळे पाण्यातील जंतूंची वाढ होते. त्यामुळे जलजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. मांस, मासे यांसारख्या पदार्थांतून संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.ताजे मांस मिळण्याची शक्यता कमी असते. हवामानामुळे मांस पटकन खराब होते. त्यातून अन्नविषबाधा होऊ शकते.
पावसाळा हा पाण्यातील प्राणी, विशेषतः मासे आणि समुद्री जीवांच्या प्रजननाचा काळ असतो. पूर्वी जेव्हा माशांचे संगोपन फारसे होत नसे, तेव्हा लोक नैसर्गिक प्रजातींच्या संवर्धनासाठी श्रावणात मासे खाणे टाळायचे. ही परंपरा एकप्रकारे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या रक्षणाची पुरातन भारतीय पद्धत होती.
58
श्रावण - प्रेम, संयम आणि आध्यात्मिक साधनेचा महिना:
श्रावण महिन्यात भक्ती आणि ध्यानाचा मोठा प्रभाव असतो. या काळात शिवभक्त कांवर यात्रा करतात. शिवलिंगावर जलाभिषेक करतात. आणि उपवास ठेवतात.हिंसक कृती (मांसाहार, प्राणीहत्त्या) हे अध्यात्माच्या मार्गात अडथळा ठरतात, असे मानले जाते. म्हणूनच श्रावणात जीव हिंसा वर्ज्य मानली गेली आहे.
68
उपवासाचे मानसिक व शारीरिक फायदे:
शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात
मन एकाग्र होते
आत्मिक शुद्धता आणि संयम वाढतो
निसर्गाशी सुसंगती साधली जाते
78
कायद्याने बंद नाही, पण संस्कृतीने मर्यादित
हे लक्षात घ्यायला हवे की, श्रावणात मांसाहारावर कुठलीही सक्तीने बंदी नाही. हे प्रथा-परंपरेवर आणि वैयक्तिक श्रद्धेवर आधारित आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने श्रावण साजरा करतो. कोणी उपवास करतो, तर कोणी भक्ती-पूजा करतो.
88
निसर्गाशी आणि स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होण्याचा पर्वकाळ
श्रावणात मांसाहार टाळण्याची परंपरा केवळ धार्मिक अंधश्रद्धेवर आधारित नसून वास्तविक वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक कारणांवर आधारित आहे. आज आधुनिक जगातही, ही परंपरा स्वास्थ्य, निसर्गस्नेही जीवनशैली आणि आत्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. श्रावण म्हणजे निसर्गाशी आणि स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होण्याचा पर्वकाळ, त्यात सात्त्विकतेचा स्वीकार हीच खरी भक्ती!