तुम्ही कधी रेल्वे ट्रॅक पाहिले असतील तर रुळांच्या आजूबाजूला खडी (दगड) दिसते. पण मेट्रोच्या रुळांवर ही खडी नसते. या दोन्ही ट्रॅकच्या बांधणीत नेमका काय फरक आहे?
सामान्य रेल्वे ट्रॅकखाली टाकलेल्या खडीला 'ट्रॅक बॅलास्ट' (Track Ballast) म्हणतात. ट्रेन धावताना रुळांवर प्रचंड वजन पडते. या वजनामुळे रुळ हलू नयेत आणि ते जागेवरून सरकू नयेत, यासाठी ही खडी महत्त्वाची भूमिका बजावते. रुळांच्या खाली आडवे टाकलेले सिमेंट किंवा लाकडाचे ठोकळे असतात, ज्यांना स्लीपर्स (Sleepers) म्हणतात. हे स्लीपर्स रुळांमधील अंतर योग्य ठेवतात आणि ट्रेनचे वजन समान विभागतात. खडीमुळे या स्लीपर्सना भक्कम आधार मिळतो. तसेच, ट्रेन वेगात धावताना होणारी कंपनं कमी करण्याचं कामही ही खडी करते.
25
ट्रॅकसाठी कोणतेही दगड वापरत नाहीत
रेल्वे ट्रॅकसाठी कोणतेही गोल किंवा गुळगुळीत दगड वापरत नाहीत. यासाठी विशिष्ट आकाराचे, टोकदार आणि खडबडीत दगड निवडतात. हे दगड एकमेकांत घट्ट अडकून राहतात, ज्यामुळे ट्रॅकची हालचाल नियंत्रणात राहते. ट्रेनच्या सततच्या ये-जा मुळे रुळांवर दाब पडतो. अशा वेळी ट्रॅक स्थिर ठेवण्याचं काम ही खडी करते. कालांतराने ही खडी झिजते किंवा तिची जागा बदलते. म्हणूनच रेल्वे कर्मचारी वेळोवेळी ट्रॅकची तपासणी करतात आणि गरज पडल्यास नवीन खडी टाकतात.
35
खडीमुळे रेल्वे ट्रॅकला काय फायदा होतो?
ट्रॅक बॅलास्टचे रेल्वे लाईनसाठी अनेक फायदे आहेत. ट्रेनचे वजन रुळांवरून स्लीपर्सकडे आणि तिथून जमिनीवर पोहोचवण्याचे काम खडी करते. यामुळे कंपनं आणि धक्के कमी होतात. पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचून राहत नाही, ते खडीच्या फटींमधून वाहून जाते. यामुळे ट्रॅकखालची जमीन ठिसूळ होण्याचा धोका टळतो. शिवाय, ट्रॅकवर गवत किंवा झाडं वाढण्यावरही नियंत्रण राहतं. खडीमुळे ट्रॅकची देखभाल करणं सोपं जातं. अर्थात, खडीमुळे ट्रेनचा आवाज पूर्णपणे बंद होत नाही, त्यासाठी ट्रेनची डिझाईन आणि इतर तंत्रज्ञानही महत्त्वाचे असते.
मेट्रो मार्गांवर बहुतांश ठिकाणी 'बॅलास्टलेस ट्रॅक' (Ballastless Track) तंत्रज्ञान वापरतात. इथे खडीऐवजी काँक्रीट स्लॅब किंवा भक्कम पायावर रुळ बसवतात. यामुळे रुळांना स्थिर आधार मिळतो आणि अचूकता टिकून राहते. शहरांमध्ये उड्डाणपूल आणि बोगद्यांमध्ये मेट्रो मार्ग बांधताना हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरते. खडी नसल्यामुळे वारंवार देखभाल करावी लागत नाही. मात्र, सर्वच मेट्रो मार्ग एकसारखे नसतात. शहराबाहेरील काही मेट्रो मार्गांवर खडीचा वापर केलेला दिसू शकतो.
55
सामान्य रेल्वे आणि मेट्रो ट्रॅकमधील मुख्य फरक
सामान्य रेल्वे आणि मेट्रो ट्रॅकमध्ये फक्त खडीचाच फरक नसून, त्यांची बांधणी आणि देखभाल यातही मोठा बदल असतो. सामान्य रेल्वेमध्ये खडी, स्लीपर्स आणि रुळ एकत्र मिळून ट्रेनचे वजन पेलतात. तर मेट्रोमध्ये काँक्रीटचा पाया आणि विशेष फास्टनिंग सिस्टीम रुळांना स्थिर ठेवते. मेट्रो ट्रॅकची रचना करताना ट्रेनचे वजन, वेग, कंपनं आणि पुलांवरील किंवा बोगद्यातील जागेचा विचार केलेला असतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .