
मुंबई : बाईक किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट हे सर्वात महत्त्वाचं सुरक्षा उपकरण आहे. पण अनेक जण एकदा घेतलेलं हेल्मेट वर्षानुवर्षे वापरतात. जोपर्यंत बाहेरून काही मोठं नुकसान दिसत नाही, तोपर्यंत ते हेल्मेट सुरक्षित आहे असं त्यांना वाटतं. पण हेल्मेटची सुरक्षा फक्त त्याच्या बाहेरील दिसण्यावर अवलंबून नसते. कालांतराने हेल्मेटमधील आतलं पॅडिंग, लायनिंग आणि इतर घटक कमकुवत होतात. त्यामुळे हेल्मेट डोक्यावर पूर्वीसारखं घट्ट बसत नाही आणि संरक्षण कमी होतं. ब्रिटनच्या परिवहन विभागाच्या 'शार्प' (SHARP) सुरक्षा योजनेनुसार, साधारणपणे ३ ते ५ वर्षांनी हेल्मेट बदलण्याचा सल्ला दिला जातो.
तुमचं हेल्मेट जर पाच वर्षांपेक्षा जास्त जुनं असेल, तर ते बदलण्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. जर तुम्ही हेल्मेट रोज वापरत असाल, तर कदाचित त्याआधीच ते बदलावं लागेल. सततच्या वापरामुळे आतलं पॅडिंग दबून हेल्मेटचं फिटिंग सैल होतं. याचा थेट परिणाम अपघाताच्या वेळी डोक्याला मिळणाऱ्या संरक्षणावर होऊ शकतो. अर्थात, प्रत्येक हेल्मेटची मुदत सारखी नसते. त्यामुळे हेल्मेट बनवणाऱ्या कंपनीच्या सूचना आणि हेल्मेटवरील निर्मितीची तारीख तपासणं महत्त्वाचं आहे.
जर तुम्ही हेल्मेट घातलेलं असताना तुमचा अपघात झाला असेल, तर ते हेल्मेट पुन्हा वापरू नका, भलेही त्यावर बाहेरून कोणतीही मोठी इजा दिसत नसेल. अपघाताच्या धक्क्यामुळे आतील सुरक्षा देणाऱ्या घटकांना डोळ्यांना न दिसणारं नुकसान झालेलं असू शकतं. अगदी जोरात जमिनीवर पडल्यासही हेल्मेटच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. 'शार्प'च्या इशाऱ्यानुसार, बाहेरून काहीही ओरखडे नसले तरी आतील रचनेला धोका पोहोचण्याची शक्यता असते.
जर हेल्मेट डोक्यावर पूर्वीसारखं घट्ट बसत नसेल, तर ते बदलण्याची वेळ आली आहे, हे समजा. पॅडिंग सैल होणं, चिन स्ट्रॅप खराब होणं किंवा हेल्मेट डोक्यावर हलणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. हेल्मेटच्या सुरक्षेमध्ये योग्य फिटिंग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कितीही महागडं हेल्मेट असलं, तरी ते डोक्याला व्यवस्थित फिट होत नसेल, तर अपघाताच्या वेळी ते योग्य संरक्षण देऊ शकणार नाही.
जुनं हेल्मेट बदलल्याने केवळ सुरक्षाच नाही, तर तुमचा प्रवासाचा आरामही वाढतो. नवीन मॉडेल्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी उत्तम सोय (वेंटिलेशन), वजनाला हलकी रचना आणि सुधारित पॅडिंग यांसारख्या सुविधा मिळतात. हेल्मेटचा व्हायझर (पुढची काच) झिजला असेल किंवा त्यावर ओरखडे आले असतील, तर तोसुद्धा बदला. 'शार्प'च्या मते, या ओरखड्यांमुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा प्रकाश पसरून तुमची दृष्टी बाधित होऊ शकते.
हेल्मेट ही केवळ एक ॲक्सेसरी नाही. अपघाताच्या वेळी डोकं आणि मेंदूला होणारी गंभीर इजा टाळण्यात त्याची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे फक्त बाहेरून चांगलं दिसतंय म्हणून जुनं हेल्मेट वर्षानुवर्षे वापरणं टाळा. ५ वर्षांपेक्षा जुनं, अपघात झालेलं किंवा फिटिंग सैल झालेलं आणि दृश्य नुकसान असलेलं हेल्मेट बदलणं हाच सुरक्षित निर्णय आहे. नवीन हेल्मेट खरेदी करताना योग्य फिटिंग, आराम आणि सुरक्षा मानकांना (सेफ्टी स्टँडर्ड्स) प्राधान्य द्या आणि कंपनीच्या सूचनांचं पालन करा.