
मुंबई : नवी कार घेण्याचा विचार करताय, पण महिन्याचा हप्ता (EMI) १०,००० रुपयांपेक्षा जास्त नकोय? मग तुमच्यासमोर मर्यादित पर्याय आहेत, असं तुम्हाला वाटत असेल. साधारणपणे या बजेटमध्ये एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक गाड्या येतात. पण काही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि सेडान गाड्यासुद्धा योग्य नियोजन केल्यास या EMI मध्ये बसू शकतात.
इथं दिलेलं EMI चं गणित हे ५ वर्षांच्या म्हणजेच ६० महिन्यांच्या कार लोनवर ९ टक्के वार्षिक व्याजदरानुसार काढलेलं आहे. महिन्याचा हप्ता १०,००० रुपयांच्या आत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार डाउन पेमेंटची रक्कम कमी-जास्त करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, तुमचा खरा EMI बँक, तुमचा सिबिल स्कोअर, इन्शुरन्स, रजिस्ट्रेशनचा खर्च, डीलरची ऑफर आणि तुम्ही कोणत्या शहरात गाडी घेत आहात यावर अवलंबून असेल.
अल्टो के10 ची अंदाजित ऑन-रोड किंमत सुमारे ४.१४ लाख रुपये आहे. यासाठी तुम्हाला कोणतंही डाउन पेमेंट न करता साधारणपणे ८,६०० रुपयांच्या EMI वर ही कार मिळू शकते. ज्यांना कमी किमतीत आणि कमी मेन्टेनन्स खर्चात गाडी हवी आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
एस-प्रेसोची ऑन-रोड किंमत सुमारे ३.९२ लाख रुपये असून, तिचा मासिक EMI अंदाजे ८,१०० रुपये येतो. ज्यांना उंच ड्रायव्हिंग पोझिशन आवडते, त्यांच्यासाठी ही छोटी कार आकर्षक ठरू शकते.
रेनॉ क्विडची ऑन-रोड किंमत सुमारे ५.०७ लाख रुपये आहे. तुम्ही फक्त २५,००० रुपये डाउन पेमेंट भरल्यास, EMI १०,००० रुपयांच्या आत ठेवता येतो. तर टाटा टियागोसाठी तुम्हाला सुमारे ४३,००० रुपये डाउन पेमेंट करावं लागेल. शहरासोबतच हायवेवर गाडी चालवणाऱ्यांसाठी टियागो एक चांगला पर्याय आहे.
सेलेरियोसाठी सुमारे ४४,००० रुपये आणि वॅगन आरसाठी ७७,००० रुपये डाउन पेमेंट केल्यास, या दोन्ही गाड्यांचा EMI तुम्ही १०,००० रुपयांच्या आसपास ठेवू शकता.
मारुती ईकोसाठी सुमारे १.०४ लाख रुपये, तर ह्युंदाई ग्रँड आय10 निओससाठी १.४५ लाख रुपये डाउन पेमेंटची गरज लागेल. ह्युंदाई एक्सटरसाठी सुमारे १.६८ लाख रुपये आणि ऑरासाठी १.९० लाख रुपये डाउन पेमेंट भरल्यास, तुम्ही या गाड्या १०,००० रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करू शकता.
कार खरेदी करताना फक्त EMI चा आकडा पाहून निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं. डाउन पेमेंट, एकूण व्याज, इन्शुरन्स, इंधनावरील खर्च, सर्व्हिसिंग आणि रजिस्ट्रेशन यांसारखे अतिरिक्त खर्चही विचारात घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा की, कमी EMI म्हणजे एकूण खर्चही कमी असेलच असं नाही.