
मुंबई : व्हॉट्सॲप युजर्सच्या फायद्याचं एक नवं फीचर लवकरच येत आहे. मेसेज, फोटो आणि व्हिडीओ आधीच तयार करून ठरलेल्या वेळेवर आपोआप सेंड करण्याचं 'शेड्युल्ड मेसेजेस' फीचर सध्या टेस्ट केलं जात आहे. काही अँड्रॉइड बीटा युजर्सना हे फीचर मिळायला सुरुवात झाली आहे. येत्या काही आठवड्यांत आणखी युजर्सपर्यंत ही सुविधा पोहोचण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेट्सवर लक्ष ठेवून असणाऱ्या 'WABetaInfo' च्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइडसाठी व्हॉट्सॲप बीटा व्हर्जन 2.26.40.7 वापरणाऱ्या काही युजर्सना सध्या ही सुविधा मिळाली आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही मेसेज आधीच टाईप करून तो पाठवण्याची तारीख आणि वेळ निवडू शकता. पर्सनल किंवा ग्रुप चॅटमध्ये मेसेज टाईप केल्यानंतर 'सेंड' बटण दाबून धरल्यास शेड्युल करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही तारीख आणि वेळ सेट करू शकता. ठरलेली वेळ येताच तुमचा मेसेज आपोआप सेंड होईल.
टेक्स्ट मेसेजसोबतच लिंक्स, फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेड्युल करता येतील, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण एका वेळी फक्त एकच फोटो किंवा व्हिडीओ शेड्युल करता येईल, अशी मर्यादा असू शकते. फोटो पाठवण्यापूर्वी तो एडिट करणं, त्यावर काही लिहिणं किंवा कॅप्शन देण्याची सुविधाही यात मिळेल. मेसेज पाठवण्याच्या १० मिनिटे आधीपासून ते थेट दोन आठवड्यांपर्यंतची वेळ तुम्ही सेट करू शकता. तुमचा फोन ऑफलाईन असला किंवा व्हॉट्सॲप बंद असलं, तरीही ठरलेल्या वेळेत मेसेज आपोआप सेंड होईल, हे या फीचरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.
शेड्युल केलेले मेसेज सेंड होण्यापूर्वी ते तपासण्याची आणि गरज पडल्यास डिलीट करण्याची सोय युजर्सना मिळणार आहे. यासाठी चॅट इन्फो स्क्रीनवर एक खास सेक्शन दिला जाऊ शकतो. तुम्ही एखादा शेड्युल केलेला मेसेज डिलीट केला, तर समोरच्या व्यक्तीला त्याचं कोणतंही नोटिफिकेशन जाणार नाही. ग्रुप चॅटच्या बाबतीत, ज्या वेळी मेसेज शेड्युल केला गेला, तेव्हा जे लोक ग्रुपमध्ये होते त्यांनाच तो मेसेज मिळेल. नंतर ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या नवीन मेंबर्सना तो जुना शेड्युल केलेला मेसेज दिसणार नाही.
हे नवं फीचर 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन'च्या सुरक्षेसह येईल अशी अपेक्षा आहे. गुगल प्ले स्टोअरवरून निवडक अँड्रॉइड बीटा युजर्सना सध्या टेस्टिंगसाठी ही सुविधा दिली जात आहे. येत्या काही आठवड्यांत हे फीचर आणखी युजर्सपर्यंत पोहोचेल, पण सर्वांसाठी हे नक्की कधी रोलआउट होईल, याची अधिकृत तारीख व्हॉट्सॲपने अद्याप जाहीर केलेली नाही.