WhatsApp Username: नंबर न देता व्हॉट्सॲपवर करा चॅटिंग! 'असं' बुक करा तुमचं आवडतं युझरनेम; प्रायव्हसी होणार अधिक सुरक्षित!

Published : Jun 30, 2026, 03:15 PM IST
WhatsApp Username

सार

WhatsApp Username : प्रायव्हसी आणखी सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन युझरनेम फीचर आणत आहे. या फीचरमुळे तुम्हाला तुमचा फोन नंबर शेअर न करता चॅट करता येईल. कंपनीने आता युझर्सना त्यांचे आवडते युझरनेम आधीच रिझर्व्ह करण्याची सोय दिली आहे. हे फीचर या वर्षाच्या अखेरीस सर्वांसाठी उपलब्ध होईल.

 सगळ्यात लोकप्रिय मेसेजिंग ॲप असलेल्या व्हॉट्सॲपने आता युझरनेम फीचर आणण्याची अधिकृत तयारी सुरू केली आहे. हे फीचर लाँच होण्याआधीच, युझर्सना त्यांचं आवडतं युझरनेम आगाऊ आरक्षित (reserve) करण्याची संधी कंपनीने दिली आहे. युझर्सची प्रायव्हसी अधिक मजबूत करणं हा या नव्या फीचरचा मुख्य उद्देश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल. यामुळे, फोन नंबर शेअर न करता फक्त युझरनेम वापरून नवीन लोकांशी चॅट करणं शक्य होणार आहे.

युझरनेम रिझर्व्ह करण्याची ही सोय जगभरातील युझर्सना टप्प्याटप्प्याने दिली जाईल. ज्यांच्या अकाउंटसाठी ही सुविधा उपलब्ध होईल, त्यांना व्हॉट्सॲपमध्येच एक नोटिफिकेशन येईल. यामुळे, ज्यांची नावं खूप कॉमन आहेत, त्यांना आपलं आवडतं युझरनेम दुसरं कोणी घेण्याआधीच मिळवता येईल.

कंपनीने स्पष्ट केलं आहे की, व्हॉट्सॲपमधील युझरनेम हे इंस्टाग्राम किंवा फेसबुकसारखं सगळ्यांना दिसणारं ओळखपत्र नसेल. युझर्सनी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर असलेलंच नाव वापरावं, असं कोणतंही बंधन नाही. गरजेनुसार युझरनेम नंतर बदलताही येईल. महत्त्वाचं म्हणजे, इथे कोणतीही सार्वजनिक युझरनेम डिरेक्टरी किंवा नावांची यादी नसेल. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचं अचूक युझरनेम माहीत असणं गरजेचं आहे.

नुकत्याच ओळख झालेल्या लोकांशी बोलताना किंवा वेगवेगळ्या ग्रुप्स आणि कम्युनिटीमध्ये सहभागी होताना ज्यांना आपला फोन नंबर द्यायचा नाही, त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायद्याचं ठरेल. वैयक्तिक प्रायव्हसी जपणं हाच यामागचा मुख्य हेतू असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यासोबतच, अधिक सुरक्षेसाठी 'युझरनेम की' (Username Key) नावाचं एक फीचरही आणलं जाईल. युझरनेम वापरून पहिल्यांदा संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला या 'की'ची गरज लागेल. युझर्स ही 'की' नंतर कधीही बदलू किंवा रिसेट करू शकतील.

सध्या जगभरात ३ अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात. त्यामुळे एकाच युझरनेमसाठी अनेकांची मागणी येऊ शकते, हे लक्षात घेऊनच कंपनीने आगाऊ रिझर्वेशन सुरू केलं आहे. जर तुम्हाला हवं असलेलं नाव उपलब्ध नसेल, तर दुसरं योग्य नाव शोधण्यासाठी 'युझरनेम जनरेटर'ची मदतही घेता येईल. याशिवाय, क्रिएटर्स, छोटे व्यावसायिक आणि संस्थांना त्यांच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरील युझरनेम मिळवून सर्व मेटा प्लॅटफॉर्मवर एकसारखी ओळख ठेवता येईल.

ज्या युझर्सना हे फीचर मिळालं आहे, त्यांनी व्हॉट्सॲपचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करून सेटिंग्स > अकाउंट > युझरनेम (Settings > Account > Username) या पर्यायावर जाऊन आपलं आवडतं युझरनेम रिझर्व्ह करता येईल. येत्या काही महिन्यांत ही सुविधा टप्प्याटप्प्याने अधिक देशांमध्ये आणि युझर्सपर्यंत पोहोचवली जाईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Saturn Retrograde: शनीची वक्री चाल पलटवणार ४ राशींचे नशीब; वृषभसह 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस!
Car Market: कुटुंबासाठी 6 लाखांच्या बजेटमध्ये 5-स्टार सेफ्टी असलेल्या बेस्ट कार्स