
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनशैलीबद्दल कोट्यवधी लोकांना नेहमीच उत्सुकता असते. वयाच्या ७५ व्या वर्षीही ते २५ वर्षांच्या तरुणासारखे न थकता काम करतात. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचे कपडे आणि त्यांचा मोबाईल याबद्दल जाणून घ्यायला सामान्य लोकांना खूप आवडतं. आज आपण पंतप्रधान मोदींच्या सिक्रेट फोनबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला माहितीये का, पंतप्रधानांना साधा स्मार्टफोन वापरण्याची परवानगी नसते. कारण, त्यांचं पदच तसं आहे.
देशाबाहेरील शत्रूंपेक्षा देशांतर्गत शत्रू अधिक धोकादायक असतात, असं म्हटलं जातं. सध्या भारताच्या बाबतीत हे अगदी खरं ठरतंय. स्मार्टफोन सहज हॅक करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला जाऊ शकतो. म्हणूनच पंतप्रधान मोदींकडे एक वेगळ्याच प्रकारचा फोन असतो. हा फोन सामान्य लोक वापरत नाहीत आणि यातली टेक्नॉलॉजीही एकदम भन्नाट असते. जागतिक नेते असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या फोनमध्ये काही खास सॉफ्टवेअर टाकलेले असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीआयपी लोकांसाठी खास डिझाईन केलेले सॅटेलाईट किंवा RAX (रेस्ट्रिक्टेड एरिया एक्सचेंज) फोन वापरतात. नवरत्न पीएसयू असलेल्या 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'ने (BEL) हा फोन तयार केला आहे. इतर सर्व संवादांसाठी त्यांच्या प्रधान सचिवांचा वापर केला जातो. प्रधान सचिवांकडेही एक खास एन्क्रिप्टेड मोबाईल फोन असतो. भारतात दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स' (C-DOT) या स्वायत्त संस्थेने ही सुरक्षित RAX कम्युनिकेशन सिस्टीम विकसित आणि डिझाईन केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून हा फोन डिझाईन करण्यात आला आहे. हा एक एन्क्रिप्टेड डिव्हाईस असून यात खास सॉफ्टवेअर वापरण्यात आलंय. हे फोन ट्रेस करता येत नाहीत. शिवाय ते मिलिटरी फ्रिक्वेन्सी बँडवर चालत असल्यामुळे त्यांना हॅक करणं अशक्य आहे. NTRO आणि DEITY सारख्या एजन्सी या फोनवर नियमितपणे लक्ष ठेवून असतात.
पंतप्रधान त्यांच्या ऑफिसच्या फोनवरून सॅटेलाईट नंबरचा वापर करून कॉल करतात. यासाठी थ्री-लेव्हल एन्क्रिप्टेड सिक्युरिटी वापरली जाते. पंतप्रधान मोदी जे फोन वापरतात, त्याचं नाव 'रुद्र' असं ठेवण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा फोन तयार केला आहे. सुरक्षेचा विचार करून आणि सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी 'रुद्र' फोनमध्ये इनबिल्ट सिक्युरिटी चिप्स बसवण्यात आल्या आहेत. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट (DEITY) यांसारख्या एजन्सी मोदींच्या मोबाईलवर लक्ष ठेवण्यासाठी कायम सज्ज असतात.