मित्र, नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने अनेकजण त्यांच्या कर्जासाठी साक्षीदार होण्यास तयार होतात. मात्र भावनेच्या भरात घेतलेला हा निर्णय भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाचे कारण ठरू शकतो. कर्जदाराने हप्ता भरण्यात चूक केल्यास त्याचा थेट परिणाम गॅरंटरवर होऊ शकतो, त्यामुळे कोणाच्याही कर्जाची हमी देण्यापूर्वी सर्व धोके समजून घेणे आवश्यक आहे.
भागीदार कर्जाचा गॅरंटर म्हणजे केवळ साक्षीदार नसतो, तर तो त्या कर्जाचा कायदेशीर जबाबदार भागीदार मानला जातो. जर मूळ कर्जदाराने कर्जफेड थांबवली किंवा कर्ज बुडवले, तर बँक किंवा वित्तीय संस्था थेट गॅरंटरकडून वसुलीची प्रक्रिया सुरू करू शकते. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जाची जबाबदारी गॅरंटरवर येऊ शकते.
गॅरंटर होण्याचा सर्वात मोठा परिणाम क्रेडिट स्कोअरवर दिसून येतो. कर्जदाराकडून हप्ते वेळेवर भरले गेले नाहीत, तर त्याची नोंद गॅरंटरच्या क्रेडिट अहवालातही होऊ शकते. त्यामुळे भविष्यात स्वतःला गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा इतर आर्थिक सुविधा मिळवताना अडचणी निर्माण होऊ शकतात. याशिवाय, गॅरंटरच्या नावावर असलेल्या बचती, मालमत्ता किंवा इतर आर्थिक साधनांनाही धोका निर्माण होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कर्जाची वसुली करण्यासाठी बँक कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबू शकते. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी अटी व शर्तींचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, नातेवाईक किंवा मित्रांसाठी गॅरंटर होण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक स्थितीचा आणि परतफेडीच्या क्षमतेचा आढावा घेणे आवश्यक आहे. भावनिक नातेसंबंधांमुळे अनेकजण धोके दुर्लक्षित करतात, पण नंतर आर्थिक तसेच कौटुंबिक तणावाला सामोरे जावे लागते. अनेक उदाहरणांमध्ये गॅरंटरला स्वतःच्या खिशातून कर्जफेड करावी लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी हमीदार होण्यापूर्वी सर्व कायदेशीर आणि आर्थिक परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. विश्वासाच्या नात्यापेक्षा आर्थिक जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरू शकते. एक सही भविष्यात मोठे आर्थिक ओझे बनू शकते, म्हणून गॅरंटर होण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.