
काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करतो. यामुळे मोतीबिंदू व अन्य डोळ्याच्या समस्या दूर होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणती जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक आहेत ते पाहूया.
1. व्हिटॅमिन ए
कॉर्नियाचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन ए डोळ्यातील अश्रूंच्या पातळ थराची (tear film) कार्यक्षमता सुधारते. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आणि डोळ्यांचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाचे आहे. यासाठी गाजर, रताळे, पालक, इतर पालेभाज्या, जर्दाळू, टरबूज, अंडी, दूध, आंबा, पपई यांसारख्या व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
2. व्हिटॅमिन सी
एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असलेले व्हिटॅमिन सी डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. हे तुमच्या डोळ्यांतील रक्तवाहिन्यांचे संरक्षण करते आणि मोतीबिंदू, मॅक्युलर डिजेनेरेशन यांसारख्या समस्यांचा धोका कमी करते. याशिवाय, ते डोळ्यांमध्ये कोलेजन उत्पादनास देखील मदत करते. यासाठी संत्री, स्ट्रॉबेरी, ढोबळी मिरची, ब्रोकोली, पेरू, किवी आणि लिंबू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
3. व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई एक उत्तम अँटिऑक्सिडंट म्हणून काम करून डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करते. यासाठी बदाम, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, अॅव्होकॅडो आणि पालक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
4. व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यामुळे ड्राय आय सिंड्रोमचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सॅल्मन फिश, बांगडा, फोर्टिफाइड दूध आणि अंड्यातील पिवळा बलक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.
5. सेलेनियम, झिंक
सेलेनियम आणि झिंक हे देखील उत्तम अँटिऑक्सिडंट म्हणून काम करून डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करतात.
6. ओमेगा-3 फॅटी ऍसिड
ओमेगा-3 फॅटी ऍसिड देखील डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. यासाठी सॅल्मन फिश, अक्रोड, चिया सीड्स आणि जवसाच्या बियांचा आहारात समावेश करा.
टीप: आहारात बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या.