
विदित यांचे आई-वडील दोघेही सरकारी कर्मचारी. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलाकडून काय अपेक्षा असणार? चांगलं शिक्षण घेऊन सुरक्षित सरकारी नोकरी मिळवावी किंवा यूपीएससी (UPSC) देऊन अधिकारी व्हावं, असंच त्यांच्याही घरच्यांना वाटत होतं. पण आयआयटी दिल्लीतून (IIT Delhi) शिक्षण पूर्ण केलेल्या या तरुणाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. आज बरोबर दहा वर्षांनंतर, त्यांनी निवडलेल्या एका वेगळ्या वाटेने भारतीय ई-कॉमर्सचा इतिहासच बदलून टाकला आहे. संजीव कुमार यांच्यासोबत मिळून त्यांनी सुरू केलेलं 'मीशो' (Meesho) आज शेअर बाजारात लिस्ट झालं असून, ९५,००० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेली ही एक महाकाय कंपनी बनली आहे.
पण हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. कॉलेजचं शिक्षण ते ९५,००० कोटींचं साम्राज्य, या प्रवासात अनेक अपयश, बदललेल्या स्ट्रॅटेजी आणि रस्त्यांवर गाळलेला घाम लपलेला आहे.
२०१२ मध्ये आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या आत्रे यांच्यासाठी स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा नवीन नव्हत्या. तरीही घरच्यांनी नेहमीप्रमाणे सरकारी नोकरी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. कुटुंबाच्या समाधानासाठी आणि अनुभवासाठी त्यांनी सुरुवातीला आयटीसी (ITC) आणि इनमोबी (InMobi) सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण तिथे काम करत असतानाही, बिझनेस कसा चालतो आणि सामान्य माणसांच्या रोजच्या समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कशा सोडवता येतील, यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. याच शोधाने त्यांना घरच्यांनी दाखवलेल्या पारंपारिक वाटेवरून बाहेर काढलं.
सुरुवातीपासूनच ॲमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्टसारखं (Flipkart) मोठं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. आत्रे आणि त्यांचे मित्र संजीव कुमार यांनी छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, अनेक स्थानिक व्यापारी ग्राहकांना वस्तू दाखवण्यासाठी व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर करत आहेत. पण व्हॉट्सॲप हे चॅटिंगसाठी आहे, पूर्ण बिझनेस चालवण्यासाठी नाही. ग्राहकांशी बोलण्यासाठी व्हॉट्सॲप, पैसे घेण्यासाठी दुसरा मार्ग आणि वस्तू पाठवण्यासाठी तिसराच मार्ग, अशा गोंधळात व्यापारी अडकले होते.
समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आत्रे आणि कुमार थेट मैदानात उतरले. त्यांनी सुरत, जयपूर आणि दिल्लीच्या चांदणी चौकातील कपड्यांच्या मार्केटमध्ये जाऊन छोट्या व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी शेकडो व्हिजिटिंग कार्ड्स गोळा केली आणि सप्लायर्सचं एक मोठं नेटवर्क तयार केलं.
तिथेच त्यांना खरी आयडिया सुचली. अनेक महिला घरबसल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनौपचारिक व्यवसाय चालवत होत्या. त्या मोठ्या सप्लायर्सकडून कपडे आणि वस्तूंचे फोटो मागवायच्या आणि आपल्या ओळखीच्या लोकांना विकून नफा कमवायच्या. या महिलांना तंत्रज्ञानाची जोड देऊन एक हक्काचं प्लॅटफॉर्म का देऊ नये? इथूनच मीशोची ठिणगी पडली.
सुरुवातीला या कंपनीचं नाव 'मीशो' नव्हतं. त्यांनी 'फॅशनिअर' (Fashnear) नावाने कपड्यांची फास्ट डिलिव्हरी देणारं हायपरलोकल प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. पण ग्राहकांना फास्ट डिलिव्हरीपेक्षा कपड्यांमध्ये व्हरायटी हवी होती. त्यामुळे ही आयडिया फ्लॉप गेली. त्यानंतर त्यांनी दुकानांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही यश आलं नाही. ग्राहकांच्या सवयी बदलण्यापेक्षा ते जे करत आहेत, त्यासाठीच तंत्रज्ञान बनवायला हवं, हे त्यांच्या लक्षात आलं. व्यापारी सोशल मीडियाचा कसा वापर करतात, यातून त्यांना नवा मार्ग सापडला.
त्यानंतर त्यांनी 'मीशो सप्लाय' सुरू केलं. याने घाऊक व्यापारी आणि व्हॉट्सॲपवरून वस्तू विकणाऱ्या सामान्य लोकांना जोडलं. इथूनच खऱ्या अर्थाने जादू झाली आणि ऑर्डर्स दर महिन्याला दुप्पट होऊ लागल्या. त्यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टला 'मीशो' (Meesho) नाव दिलं. मीशो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 'मेरी शॉप' (Meri Shop - माझं दुकान) चं शॉर्ट फॉर्म आहे. एखाद्या गृहिणीला किंवा छोट्या व्यापाऱ्याला स्वतःचा ॲप बनवण्याचा खर्च न करता स्वतःचं डिजिटल दुकान थाटता यावं, हाच यामागचा मुख्य उद्देश होता.
सोशल कॉमर्स (Social Commerce) म्हणून सुरू झालेलं मीशो आज डिस्ट्रीब्युटर्स, विक्रेते आणि कोट्यवधी ग्राहकांना जोडणारी एक मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, २०२४ च्या अखेरीस मीशोचे १९ कोटी युजर्स आणि ४ लाख विक्रेते होते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात २६% वाढ होऊन तो ९,९०० कोटी रुपयांवर पोहोचला. ३ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान आलेल्या मीशोच्या आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि तो तब्बल ७९ पटींनी सबस्क्राईब झाला.
१० डिसेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात लिस्ट होताना, १११ रुपये इश्यू प्राईस असलेला हा शेअर एनएसईवर (NSE) १६२.५० रुपयांवर उघडला, म्हणजेच तब्बल ४६% प्रीमियम मिळाला. २० ऑगस्ट २०२६ च्या आकडेवारीनुसार, एका शेअरची किंमत सुमारे २०५ रुपये असून कंपनीचं एकूण मार्केट कॅप ९५,००० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. सरकारी नोकरीच्या सुरक्षित चौकटीत न अडकता, रस्त्यावर उतरून छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत विदित आत्रे यांनी मिळवलेलं हे यश, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक मोठा धडा आहे!