देशांतर्गत विक्री (प्रवासी वाहने, हलकी व्यावसायिक वाहने आणि OEM पुरवठा) 3.2% वाढून 1.80 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली. तर प्रवासी वाहनांची विक्री 2.9% वाढून 1.66 दशलक्ष युनिट्स झाली. यात, युटिलिटी व्हेइकल्स (UV) सेगमेंट विक्री वाढीचा मुख्य स्रोत ठरला, जो 4.6% वाढून 689,631 युनिट्सवर पोहोचला. याउलट, 'मिनी सेगमेंट'ची विक्री 11.9% घसरून 100,550 युनिट्स झाली, जे एन्ट्री-लेव्हल गाड्यांची मागणी कमकुवत असल्याचे दर्शवते. तर, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो यांसारख्या मॉडेल्सच्या मजबूत विक्रीमुळे 'कॉम्पॅक्ट सेगमेंट'मध्ये 4.6% वाढ होऊन विक्री 736,313 युनिट्सवर पोहोचली. एसयूव्ही गाड्यांबद्दल लोकांची आवड वाढल्यामुळे, मिड-साईज सेडान सेगमेंटच्या विक्रीत 74.4% घट झाली. एन्ट्री आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मारुतीचे स्थान मजबूत आहे. मिनी सेगमेंटमध्ये अल्टो के10, एस-प्रेसो, तर कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, इग्निस यांसारखी मॉडेल्स आहेत. ही सर्व मॉडेल्स पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. प्रवासी वाहन क्षेत्रात भारतासाठी दीर्घकालीन वाढीची संधी आहे. भारतात दर 1000 लोकांमागे फक्त 30 गाड्या आहेत, तर चीनमध्ये हा आकडा 223 आणि अमेरिकेत 755 आहे.