
जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगन भारतीय मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'इंडिया 2.0' स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन आणि अपडेटेड कार्स आणणार आहे. याच प्लॅननुसार, डिसेंबरमध्ये व्हर्टस (Virtus) फेसलिफ्ट लाँच होईल. त्यानंतर 2027 च्या सुरुवातीला एक नवीन सब-4 मीटर SUV मार्केटमध्ये धडक मारणार असल्याची चर्चा आहे. या नवीन SUV ची सुरुवातीची किंमत जवळपास 8 लाख रुपये असू शकते. ही फॉक्सवॅगनची भारतातील सर्वात स्वस्त SUV असेल. या कारची थेट टक्कर टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट आणि महिंद्रा XUV 3XO यांसारख्या गाड्यांशी होईल.
2022 मध्ये पोलो (Polo) कारचं प्रोडक्शन थांबवल्यानंतर, फॉक्सवॅगन पहिल्यांदाच भारतातील सब-4 मीटर सेगमेंटमध्ये कमबॅक करत आहे. या नवीन SUV च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत साधारण 8 लाख रुपये, तर टॉप व्हेरियंटची किंमत 13 लाख रुपयांपर्यंत असू शकते. बजेट SUV सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणं, हाच फॉक्सवॅगनचा यामागचा मुख्य उद्देश आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही नवीन फॉक्सवॅगन SUV स्कोडा कायलाक (Skoda Kylaq) चं प्लॅटफॉर्म आणि इंजिन शेअर करेल. पण डिझाईन आणि काही एक्स्ट्रा फीचर्सच्या बाबतीत ती वेगळी असेल. MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर तयार होणाऱ्या या कारमध्ये 1.0 लिटर TSI टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 115 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करतं. सध्या डिझेल किंवा CNG व्हर्जनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. स्कोडा कायलाकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन्स आहेत. पण फॉक्सवॅगनच्या या नव्या SUV मध्ये सुरुवातीपासूनच 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. सोबतच 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्यायही असेल.
ब्राझीलमध्ये विकल्या जाणाऱ्या फॉक्सवॅगन टेरा (Volkswagen Tera) च्या डिझाईनवरून या नवीन भारतीय SUV च्या लूकचा अंदाज येतो. पण भारतीय मार्केटनुसार यात काही बदल केले जाऊ शकतात. नवीन ग्रिल, स्लिम LED हेडलॅम्प्स, कनेक्टेड LED DRLs आणि स्पोर्टी बंपर हे याचे मुख्य आकर्षण असतील. याशिवाय ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बॉडी क्लॅडिंग, रूफ रेल्स आणि कनेक्टेड LED टेल लॅम्प्सही या कारमध्ये पाहायला मिळतील. ब्राझीलमधील फॉक्सवॅगन टेराची लांबी 4,151 मिमी आहे. पण भारतात येणाऱ्या मॉडेलची लांबी 4,000 मिमी पेक्षा कमी असेल, जेणेकरून ती सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये बसेल. स्कोडा कायलाकप्रमाणेच यात 2,566 मिमीचा व्हीलबेस मिळण्याची अपेक्षा आहे.
फीचर्सच्या बाबतीतही ही नवीन फॉक्सवॅगन SUV एकदम भारी असेल. यात थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर AC व्हेंट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अॅम्बियंट लायटिंग आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारख्या सुविधाही यात असू शकतात. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि रिअर पार्किंग सेन्सर्स मिळतील अशी अपेक्षा आहे.
2027 च्या सुरुवातीला लाँच होणाऱ्या या नवीन फॉक्सवॅगन SUV चं अधिकृत नाव, अचूक किंमत आणि फीचर्स कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाहीत. तरीही, 8 लाख रुपयांची अपेक्षित किंमत, टर्बो पेट्रोल इंजिन आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे ही कार भारतीय SUV मार्केटमध्ये नक्कीच धुमाकूळ घालेल.