
मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये येत्या काही महिन्यांत मोठी खळबळ उडणार आहे. दिग्गज कार कंपन्या त्यांच्या नव्या एसयूव्ही (SUV) आणि अपडेटेड एमपीव्ही (MPV) लाँच करण्याच्या तयारीत आहेत. कारप्रेमी सध्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचं अपडेटेड मॉडेल, महिंद्रा थार रॉक्सचं फेसलिफ्ट आणि जेएसडब्ल्यू मोटर्सची पहिली एसयूव्ही 'कॉम्बॅट'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापैकी काही गाड्या २०२६ च्या अखेरीस मार्केटमध्ये धडकतील. या गाड्यांचे फीचर्स आणि इंजिनबद्दल जाणून घ्या.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचं नवं अपडेटेड मॉडेल नोव्हेंबर २०२६ मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या नव्या मॉडेलमध्ये फ्रंट ग्रिल, अपडेटेड बंपर, नवे एलईडी हेडलाईट्स, डिझायनर अलॉय व्हील्स आणि टेललाईट्समध्ये बदल पाहायला मिळतील. याच्या पुढच्या डिझाईनवर टोयोटा हायलक्स सायबर-सुमोची (Toyota Hilux Cyber-sumo) झलक दिसू शकते.
इंजिनमध्ये काही बदल होणार का?
कंपनी यात जुनेच इंजिन ऑप्शन्स कायम ठेवण्याची शक्यता आहे. यातील २.० लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन १७३ पीएस (PS) पॉवर आणि २०४ एनएम (Nm) टॉर्क जनरेट करतं. तर, २.० लिटर स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेल १८४ पीएस पॉवर देतं. हायब्रिड मॉडेलमध्ये ई-सीव्हीटी (e-CVT) गिअरबॉक्स मिळतो. फीचर्सचा विचार केला तर, हायब्रिड व्हर्जनमध्ये १२.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकतो. पेट्रोल व्हर्जनमध्ये जुनाच ॲनालॉग मीटर आणि ७ इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले कायम राहील. याशिवाय, टोयोटाची टी-इनटच (T-Intouch) कनेक्टेड कार सिस्टीमही यात मिळण्याची अपेक्षा आहे.
तीन दरवाजांच्या थारचं नवं मॉडेल आणल्यानंतर, आता महिंद्रा थार रॉक्समध्येही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. नव्या अलॉय व्हील्स आणि सस्पेन्शन सिस्टीममधील बदलांची यात प्रामुख्याने अपेक्षा आहे.
सस्पेन्शनमध्ये मोठा बदल
या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवं रिअर पेंटालिंक सस्पेन्शन आणि वॅट्स लिंकेज सिस्टीम दिली जाऊ शकते. यामुळे गाडीचं बॅलन्स आणि प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. अपडेटेड थारप्रमाणेच यातही १९ इंचाचे अलॉय व्हील्स मिळू शकतात. यात जुनेच २.२ लिटर टर्बो डिझेल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. हे इंजिन १७५ पीएस पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क जनरेट करतं. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन्स मिळतील. सोबतच रिअर-व्हील ड्राईव्ह आणि फोर-व्हील ड्राईव्ह सिस्टीमही कायम राहील. फीचर्समध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ९ स्पीकर्स असलेली हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीम आणि वायरलेस चार्जिंग मिळू शकतं. सुरक्षेसाठी ३६०-डिग्री कॅमेरा, लेव्हल २ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि सहा एअरबॅग्स दिले जातील.
जेएसडब्ल्यू मोटर्सची पहिली एसयूव्ही 'कॉम्बॅट' भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज आहे. ही गाडी चिनी एसयूव्ही 'जेटूर टी२' (Jetour T2) वर आधारित बॅज-इंजिनिअर्ड मॉडेल असेल, असे रिपोर्ट्स आहेत. या गाडीची बॉक्सी डिझाईन आणि रफ-अँड-टफ लूक तिला एक वेगळी ओळख देईल.
प्लग-इन हायब्रिड इंजिन
कॉम्बॅटमध्ये प्लग-इन हायब्रिड सिस्टीम मिळण्याची अपेक्षा आहे. यात १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि १८.४ किलोवॅट-अवर (kWh) ची बॅटरी असेल. हे पॉवरट्रेन ३६० पीएस पॉवर आणि ६१० एनएम टॉर्क जनरेट करेल. भारतीय मॉडेलमध्येही हेच फीचर्स राहिल्यास, ही गाडी रस्त्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देईल. यात मोठे डिस्प्ले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली केबिन मिळू शकते. डिसेंबर २०२६ मध्ये कॉम्बॅट भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
नवे फीचर्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार इंजिन ऑप्शन्ससह येणाऱ्या या तीन गाड्या भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये तगडी स्पर्धा निर्माण करतील. फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट असलेली इनोव्हा हायक्रॉस, ऑफ-रोडिंगचा बादशाह असलेली थार रॉक्स आणि नवी प्लग-इन हायब्रिड एसयूव्ही कॉम्बॅट, या तिन्ही गाड्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपली छाप सोडतील.
टीप : या गाड्यांच्या लाँचिंगच्या तारखा आणि फीचर्स मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहेत. कंपन्यांच्या अधिकृत घोषणेनंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल.