लांब पल्ल्याच्या गाड्या बहुतांश रात्रीच्या वेळी प्रवास करतात. यासाठी लोको पायलटने अतिशय सतर्क राहावं लागतं. पण समजा भरधाव ट्रेनमध्ये ड्रायव्हरला डुलकी लागली, तर काय होईल? जाणून घेऊया रेल्वेची सुरक्षा व्यवस्था कशी काम करते.
मध्यरात्री एखादी सुपरफास्ट ट्रेन ताशी 120 किमी वेगाने धावत असते आणि प्रवासी गाढ झोपेत असतात. नेमक्या त्याच वेळी इंजिनमधील लोको पायलटचा डोळा लागला तर काय होईल? अनेक प्रकरणांमध्ये सुरक्षा यंत्रणा पायलटला अलर्ट करते किंवा प्रतिसाद न मिळाल्यास ट्रेन आपोआप ब्रेक लावून थांबते. पण ही यंत्रणा प्रत्येक वेळी अपघात रोखू शकेलच असं ठामपणे सांगता येत नाही. झोपेच्या गुंगीत रेड सिग्नल ओलांडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. "ट्रेन ड्रायव्हरला झोप लागली तर काय होतं? ही सुरक्षा प्रणाली कशी काम करते आणि त्यात त्रुटी कुठे येतात? ते जाणून घेऊया.
इंजिनमध्ये दोन पायलट आणि व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाइस (VCD)
भारतीय रेल्वेतील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या इंजिनमध्ये साधारणपणे लोको पायलटसोबत असिस्टंट लोको पायलटही असतो. एकाने सिग्नल पाहिला नाही तर दुसऱ्याने तो ओळखावा, हा यामागचा हेतू. पण दोघेही माणूसच असल्याने त्यांनाही थकवा येऊ शकतो. म्हणूनच रेल्वे केवळ मानवी सतर्कतेवर अवलंबून राहत नाही. भारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये बसवलेलं व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाइस (VCD) पायलट जागा आहे की नाही, हे सतत तपासत असतं. वेग बदलणं, हॉर्न वाजवणं, ब्रेक लावणं किंवा विशिष्ट बटण दाबणं यासारख्या कृतींवरून सिस्टीम ओळखते की पायलट ॲक्टिव्ह आहे.
24
पेनल्टी ब्रेक म्हणजे काय?
ठराविक वेळेत पायलटकडून कोणतीही हालचाल किंवा प्रतिसाद न मिळाल्यास आधी लाईट चमकते, नंतर अलार्म वाजतो. तरीही प्रतिसाद न आल्यास सिस्टीम इमर्जन्सी ब्रेक लावते. यालाच पेनल्टी ब्रेक म्हणतात. पूर्वी याऐवजी डेड मॅन्स हँडल असायचं; पायलटने ते सोडलं की लगेच ब्रेक लागायचा.
कवच (Kavach) सिस्टम
सध्या भारतीय रेल्वेमध्ये अनेक मार्गांवर 'कवच' (ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन) तंत्रज्ञान वापरलं जात आहे. समजा ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने रेड सिग्नल पाहिला नाही, तरी ही सिस्टीम तो ओळखून आपोआप ब्रेक लावते आणि ट्रेन थांबवते.
34
जपान बुलेट ट्रेनची घटना
ही ऑटोमॅटिक सिस्टीम कशी काम करते, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 26 फेब्रुवारी 2003 रोजी जपानमध्ये घडलेली घटना. सान्यो शिंकानसेन लाईनवर बुलेट ट्रेन चालवणारा 33 वर्षांचा ड्रायव्हर जवळपास आठ मिनिटं झोपला होता. त्या वेळात ट्रेनने सुमारे 26 किलोमीटर प्रवास केला. पण तिथल्या ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल सिस्टीमने वेग कमी केला आणि ओकामा स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या सुमारे 100 मीटर आधी ट्रेन थांबवली. कोणालाही काहीही इजा झाली नाही. वैद्यकीय तपासणीत त्या ड्रायव्हरला स्लीप ॲप्निया असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेनंतर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या स्लीप ॲप्निया तपासणीवर अधिक भर दिला गेला.
व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाइस असूनही अपघात का होतात, याचं एक कारण म्हणजे 'मायक्रो स्लीप'. जून 2023 मध्ये पश्चिम बंगालमधील बांकुराजवळ ओंडा येथे आणि जून 2024 मध्ये पंजाबमधील सरहिंद येथे झालेल्या मालगाड्यांच्या धडकेच्या तपासात मायक्रो स्लीप आणि डुलकी लागल्याचा मुद्दा समोर आला. काही सेकंदांसाठी मेंदू बंद पडणाऱ्या या मायक्रो स्लीपमध्ये डोळे उघडे असले तरी काय चाललंय ते समजत नाही. VCD केवळ हालचाली नोंदवतं; अलार्म वाजेपर्यंत भरधाव ट्रेन रेड सिग्नल ओलांडण्याची शक्यता असते.
या समस्येवर मात करण्यासाठी स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम 'कवच' टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. सिग्नल, वेग आणि ट्रेनचं लोकेशन यानुसार पायलटने ब्रेक लावला नाही, तर ही सिस्टीम स्वतःच ब्रेक लावून ट्रेन थांबवते. दुसरीकडे, सलग नाईट ड्युटी, जास्त कामाचे तास आणि पुरेशा विश्रांतीअभावी येणारा थकवा हीच खरी समस्या असल्याचं म्हटलं जातं.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .