
जेव्हा शरीरातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात, तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात. सध्या अनेकांची जीवनशेैली बदलल्याने अनेक जणांना कॅन्सर सारख्या रोगाचा सामना करावा लागत आहे. मात्र, दररोज कॅन्सरला प्रतिबंध करणारे विविध प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि कालांतराने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चने कॅन्सरचा धोका कमी करणाऱ्या आठ पदार्थांबद्दल माहिती दिली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.
सफरचंद -
सफरचंदात फायबर आणि पॉलिफेनॉल संयुगे असतात. हे घटक कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात. सफरचंदामुळे इस्ट्रोजेन रिसेप्टर-निगेटिव्ह (ER-) स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे आढळून आले आहे.
गाजर -
गाजर ही एक स्टार्च नसलेली भाजी आहे, ज्यामध्ये कॅरोटीनॉइड्स आणि इतर फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे त्यात कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते.
कॉफी -
कॉफी प्यायल्याने एंडोमेट्रियल आणि यकृताच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे.
लसूण -
लसणामध्ये असलेल्या अॅलियम संयुगांमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने काही प्रकारचे कॅन्सर, विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सरचा धोका कमी होतो.
संत्री -
संत्री हे सर्वात सामान्य सायट्रस फळ आहे, जे अँटिऑक्सिडंट आणि इतर कॅन्सर-प्रतिबंधक गुणधर्म प्रदान करू शकते. संत्र्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्यास किडनी खराब होऊ शकते.
टोमॅटो -
टोमॅटोमुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो, असे अभ्यासात म्हटले आहे. टोमॅटोमध्ये फायदेशीर संयुगे, विशेषतः लाइकोपीन असते. हे फुफ्फुस आणि स्तनाच्या कॅन्सरसारख्या काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
ब्लूबेरी -
ब्लूबेरीमध्ये विविध प्रकारचे फायटोकेमिकल्स आणि खनिजे असतात. यामध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असल्याचे विविध अभ्यासांमधून दिसून आले आहे.