
टेस्लाचं लक्ष वेधून घेणारं इलेक्ट्रिक पिकअप ट्रक म्हणजेच 'सायबरट्रक' (Cybertruck). कंपनी आता याचं उत्पादन बंद करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेतील टेक्सास येथील गिगाफॅक्टरीमध्ये 2027 च्या मध्यापर्यंत सायबरट्रकचं उत्पादन थांबवलं जाण्याची शक्यता आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.
मस्क यांनी स्पष्ट केलंय की, सायबरट्रकचं उत्पादन थांबवल्यास फॅक्टरीमध्ये जास्त जागा उपलब्ध होईल. ही जागा नव्या सायबरकॅबच्या (Cybercab) उत्पादनाला चालना देण्यासाठी वापरली जाईल. उत्पादन सुरू होऊन जेमतेम तीन वर्षे उलटत असतानाच सायबरट्रक बंद करण्याच्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी टेस्लाने मॉडेल एस (Model S) आणि मॉडेल एक्स (Model X) या कार्सचं उत्पादनही थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
टेस्लाने 2019 मध्ये सायबरट्रकला पहिल्यांदा कन्सेप्ट मॉडेल म्हणून लोकांसमोर आणलं होतं. कंपनीची मूळ योजना होती की, 2021 मध्ये त्याची विक्री सुरू करावी. पण वेगवेगळ्या कारणांमुळे लॉन्च लांबणीवर पडलं. अखेर 2023 मध्ये टेक्सासच्या गिगाफॅक्टरीमध्ये त्याचं उत्पादन सुरू झालं आणि ही गाडी बाजारात आली.
सायबरट्रकची मुख्य स्पर्धा फोर्ड एफ-150 लाइटनिंग (Ford F-150 Lightning) सारख्या इलेक्ट्रिक पिकअप ट्रक्ससोबत होती. अमेरिका, मेक्सिको, कॅनडा, यूएई, कतार, दक्षिण कोरिया आणि सौदी अरेबिया यांसारख्या बाजारांमध्ये ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे. सुरुवातीच्या काळात सायबरट्रकने लोकांचं चांगलंच लक्ष वेधलं. स्टेनलेस स्टीलची बॉडी आणि एकदम वेगळा लूक यामुळे ही गाडी चर्चेत राहिली. पण त्यानंतर मात्र विक्रीत घट झाली. सुरक्षेच्या निकषांशी संबंधित चिंतांमुळे टेस्ला युरोपियन मार्केटमध्ये ही गाडी आणू शकली नाही.
उत्पादन थांबवण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, सायबरट्रकला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. 2019 मध्ये जेव्हा ही गाडी सादर झाली, तेव्हा जाहीर केलेल्या किमतीपेक्षा प्रत्यक्षात विक्री सुरू झाली तेव्हाची किंमत खूपच जास्त होती. याशिवाय इलॉन मस्क यांच्याभोवतीच्या वादांचाही गाडीच्या लोकप्रियतेवर परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आतापर्यंत सुमारे 63,000 सायबरट्रक्सची विक्री झाल्याचा अहवाल आहे. मस्क यांची अपेक्षा होती की, वर्षाला 2.5 लाख युनिट्स विकले जातील. पण प्रत्यक्ष विक्री या लक्ष्यापेक्षा खूपच कमी राहिली.
सायबरट्रकचं उत्पादन थांबलं, तर टेस्लाचं मुख्य लक्ष सायबरकॅबकडे वळेल. कंपनी सायबरकॅबला पूर्णपणे ऑटोनॉमस (स्वयंचलित) इलेक्ट्रिक टॅक्सी म्हणून विकसित करत आहे. नेहमीच्या गाड्यांपेक्षा वेगळं म्हणजे, सायबरकॅबमध्ये स्टीअरिंग व्हील, अॅक्सिलरेटर, ब्रेक पेडल्स आणि बाहेरचे रिअरव्ह्यू मिरर्स नसणार. मागील बाजूस असलेली काच (विंडशील्ड) देखील हटवण्यात आली आहे. बटरफ्लाय डोअर्स हे याचं आणखी एक वैशिष्ट्य. टेस्लाच्या राईड हेलिंग (ride-hailing) सर्व्हिसचा भाग म्हणून ही गाडी वापरली जाईल.
सायबरट्रकचं उत्पादन बंद झालं, तर ग्लोबल मार्केटमध्ये टेस्लाच्या प्रमुख पॅसेंजर कार मॉडेल्स म्हणून फक्त मॉडेल 3 (Model 3) आणि मॉडेल वाय (Model Y) उरतील. दुसरीकडे, नेक्स्ट जनरेशन रोडस्टरची (Roadster) डिलिव्हरी 2028 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कंपनी सध्या अधिक कॉम्पॅक्ट आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीवरही लक्ष केंद्रित करत आहे. पण, हे मॉडेल कधी लॉन्च होईल, याची कोणतीही टाइमलाइन अद्याप जाहीर केलेली नाही. सायबरट्रकच्या भविष्याबाबतचा हा निर्णय टेस्लाच्या उत्पादन धोरणात मोठा बदल घडवून आणू शकतो. पण, उत्पादन कधी थांबणार, याची नेमकी तारीख आणि इतर तपशील याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळणं बाकी आहे.