
Tata Sierra Returns to India : 1990 च्या दशकातील आयकॉनिक मॉडेल टाटा सिएरा अखेर भारतीय बाजारात परतली आहे. टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही, टाटा सिएरा, लाँच केली आहे. नवीन सिएरा 11.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. दमदार लूक, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि एक आधुनिक एसयूव्हीची इच्छा असणाऱ्या भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी ही एक उत्तम निवड असेल. टाटा सिएराने आपली ओळख कायम ठेवत, यावेळी अधिक आधुनिक, शक्तिशाली आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत डिझाइनसह पुनरागमन केले आहे. चला, सिएराची वैशिष्ट्ये, डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स पाहूया.
टाटा सिएराला तिच्या पूर्वीच्या मॉडेलपासून प्रेरित बॉक्सी डिझाइन मिळाले आहे. त्याच वेळी, टाटा सिएराचे डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि फ्युचरिस्टिक आहे. समोरच्या बाजूला फुल-विड्थ एलईडी लाईट बार, मस्क्युलर बॉडी लाईन्स, फ्लश डोअर हँडल्स आणि प्रीमियम डिझाइन घटक सिएराला तिच्या सेगमेंटमधील सर्वात वेगळ्या एसयूव्हीपैकी एक बनवतात. केबिनमध्ये नवीन थ्री-स्क्रीन थिएटर प्रो सेटअप, जेबीएलची प्रीमियम साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. ही एसयूव्ही आराम, जागा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ आहे.
नवीन टाटा सिएरा पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. ड्रायव्हिंगची शैली आणि गरजेनुसार इंजिन निवडायला आवडणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ग्राहकांना वैशिष्ट्यांची कमतरता भासू नये यासाठी बेस व्हेरिएंटमध्येही सर्वसमावेशक सुविधा देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय, ही एसयूव्ही सहा आकर्षक रंगांमध्ये येते, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा व्हेरिएंट निवडता येतो.
टाटा सिएराची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन सिएराची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि होंडा एलिव्हेट यांसारख्या लोकप्रिय मिड-साईज एसयूव्हींशी होईल.
नवीन टाटा सिएरासाठी बुकिंग 16 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल. तर डिलिव्हरी 15 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.