
पाण्याच्या बाटल्या असो की डबे, सध्या प्लास्टिक ऐवजी स्टीललाच प्राधान्य दिले जाते. आरोग्याचा विचार करता त्याचे कारणही तसेच आहे. प्लास्टिक हे भूतलावरील जीवांना हानीकारक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यातच त्यासाठी वापरण्यात येणारे रंगही आरोग्यास हानीकारक ठरतात. खेळण्यांच्या बाबतीत तर हे रंग विषारी असल्याचे उघड देखील झाले आहे. मग विषाची परीक्षा कशासाठी? असाच सारासार विचार करून सर्वसामान्य सध्या स्टीलच्या वस्तू वापरण्यावरच भर देताना दिसतात. मग चहाच्या गाळण्यांचे काय? कारण आजही अनेक घरांतून प्लास्टिकचीच चहा गाळणी पाहायला मिळतात. ही गाळणी वापरणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत का? याचीच आपण माहिती घेऊया -
स्टील की प्लास्टिक चहा गाळणे? चहा बनवण्यामधील सर्वात छोटी गोष्ट म्हणजे गाळणे किंवा चहा स्ट्रेनर, ही सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण चहा गाळणे हे आपल्या आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, जितकी चहा पावडर आणि साखर. बाजारात तुम्हाला प्लास्टिक आणि स्टील दोन्ही प्रकारचे गाळणे मिळेल, पण आरोग्यासाठी कोणते सर्वोत्तम आहे, हे प्रत्येकालाच सांगता येणार नाही. अनेकजण स्वस्त असल्यामुळे प्लास्टिकचे गाळणे निवडतात, तर काहीजण टिकाऊ असल्यामुळे स्टीलचे गाळणे खरेदी करतात. पण प्रश्न आरोग्याचा आहे, की आरोग्याच्या दृष्टीने कोणते गाळणे चांगले आहे?
सर्वात आधी हे समजून घ्या की, चहा गाळताना तुम्हाला सुमारे 90-100°C तापमानाचा सामना करावा लागतो. अशावेळी जर गाळण्याची क्वालिटी चांगली नसेल, तर ती लवकर खराब होऊ शकते आणि त्यातून केमिकल आणि मायक्रोप्लास्टिक बाहेर पडू शकतात.