
अनेकांना वाटते की मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी होते. यात काही तथ्य आहे का? पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांच्या मते, खरं तर बहुतेक लोकांच्या ॲसिडिटीमागे केवळ मसालेदार पदार्थ हे एकमेव प्रमुख कारण नाही. नमामी सांगतात की, अशा अनेक लपलेल्या जीवनशैली आणि आहारातील सवयी आहेत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
ॲसिडिटी नेहमी आदल्या रात्री काय खाल्ले यावर अवलंबून नसते. कधीकधी तुमचे शरीर शांतपणे कोणत्या गोष्टी गमावत आहे किंवा कशाशी संघर्ष करत आहे यावर ते अवलंबून असते, असे नमामी अग्रवाल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
पोषणतज्ज्ञ सांगतात की, लोहाची कमतरता केवळ थकवा किंवा अशक्तपणा आणण्यापुरती मर्यादित नाही. लोहाच्या कमतरतेमुळे पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे ॲसिड जमा होऊन छातीत जळजळ होऊ शकते. आणखी एक दुर्लक्षित घटक म्हणजे होमोसिस्टीनची उच्च पातळी. नमामी अग्रवाल यांच्या मते, लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंड्यांच्या अतिसेवनामुळे सामान्यतः होमोसिस्टीनची पातळी वाढते.
मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे स्नायूंमध्ये ताण येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असेही पोषणतज्ज्ञ सांगतात.
ॲसिडिटीला कारणीभूत ठरणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तणाव. जेव्हा तणावाची पातळी वाढते, तेव्हा शरीर अधिक कॉर्टिसोल तयार करते. जर शरीर उच्च साखरेच्या पातळीशी झुंज देत असेल, तर सूज वाढते आणि पोट अतिरिक्त ॲसिड तयार करून प्रतिक्रिया देते.
छातीच्या मध्यभागी जळजळ, आंबट ढेकर, पोटदुखी/अस्वस्थता, मळमळ, उलट्या आणि गिळण्यास त्रास होणे ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत.