Railway Update: आई तुळजाभवानीचं दर्शन आता 'ट्रेन'नं! रखडलेला सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग सुसाट; सरकारचा मोठा निर्णय!

Published : Feb 07, 2026, 04:16 PM IST

Solapur-Tuljapur-Dharashiv railway line: राज्य शासनाने बहुप्रतिक्षित सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गासाठी 150 कोटीचा निधी मंजूर केला. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे तुळजापूर थेट रेल्वेने जोडले जाणार असून, भाविकांचा प्रवास सुलभ होईल. 

PREV
15
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाला अखेर गती

Railway Update: महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देवी तुळजाभवानीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तुळजापूर लवकरच थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या महत्त्वाच्या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचा 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याबाबतचा शासन निर्णय 6 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे.

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून या बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. 

25
वर्षानुवर्षांची मागणी अखेर मार्गी

तुळजापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असले तरी आजपर्यंत ते थेट रेल्वेने जोडले गेले नव्हते. भाविक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांकडून रेल्वे संपर्काची मागणी सातत्याने होत होती. मात्र, उत्पन्नाच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा नसल्याचा (Not Feasible) शिक्का मारत रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित ठेवला होता. 

35
मोदींच्या आश्वासनानंतर प्रकल्पाला चालना

2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 2019 मध्ये हा प्रकल्प रेल्वेच्या ‘पिंक बुक’मध्ये समाविष्ट करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 904 कोटी 92 लाख रुपये इतका होता. 

45
खर्चात मोठी वाढ, पण आशा कायम

तत्कालीन महायुती सरकारने प्रकल्पाच्या 50 टक्के खर्चाची जबाबदारी स्वीकारत 452 कोटी 46 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, कालांतराने प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, सध्या या रेल्वेमार्गाची एकूण किंमत सुमारे 3295 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे दायित्व वाढून 1647 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

यापैकी 40 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, आता मंजूर झालेल्या 150 कोटी रुपयांच्या निधीमुळे प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

55
भाविकांसाठी मोठा दिलासा

हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, सोलापूर आणि धाराशिव परिसराच्या आर्थिक व पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories