
२४/७ संस्कृतीमध्ये, विश्रांती ही एक ऐषारामाची गोष्ट झाली आहे. झोपेला (sleep) लोक हलक्यात घेत आहेत. झोपेपेक्षा काम महत्त्वाचे असे म्हणणारे जास्त आहेत. काम, कुटुंब, फोन, टीव्ही असे रात्रभर व्यस्त असणारे लोक आहेत. यामुळे त्यांची झोप कमी होत आहे. शरीराला विश्रांती खूप महत्त्वाची आहे.
तुम्ही कोणत्याही कारणाने झोप सोडली, तर तुमचे शरीर एका ना एका वेळी निषेध करायला सुरुवात करेल. झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, हृदयविकाराचा आजार, पक्षाघात यासह अनेक आजार तुम्हाला वेढतील. काम महत्त्वाचे, झोपही महत्त्वाची, पण दोन्हीही बॅलन्स करता येत नाही अशांसाठी एक चांगली आयडिया आहे. भविष्यासाठी आवश्यक म्हणून आपण सर्वजण पैसे जमा करतो. त्याचप्रमाणे तुम्ही झोपेची बँकिंग करू शकता. अलिकडच्या काळात ही स्लीप बँकिंग सामान्य होत आहे. स्लीप बँकिंग म्हणजे काय? त्याचे फायदे - तोटे काय आहेत याची माहिती येथे आहे.
स्लीप बँकिंग (sleep banking) म्हणजे काय? :
स्लीप बँकिंग ही एक सोपी पण रंजक कल्पना आहे. हळूहळू वैज्ञानिक मान्यता मिळत आहे. तुम्ही बँकेत जास्त पैसे जमा केले तर पुढे जास्त खर्च करू शकता. तसेच जास्त पैसे काढले तर बँक बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतात. स्लीप बँकिंग देखील असेच आहे. आठवड्याभर व्यवस्थित झोप घेता येत नसेल तेव्हा, ती झोप आधीच घेण्याला स्लीप बँकिंग म्हणतात. काम झाल्यावर, शरीर थकल्यावर झोपण्याऐवजी आधीच झोपण्याला तज्ज्ञ जास्त गुण देतात. बाहेर जायचे असल्यास आपण मोबाईल पूर्ण चार्ज करतो. त्याचप्रमाणे, पुढे काम आहे तेव्हा आधीच झोप घेणे.
जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिनमध्ये २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार
नाईट शिफ्टच्या आधीच्या दिवसांत जास्त झोप घेतलेल्या आणि रात्रीच्या शिफ्टच्या आठवड्यात आठ तासांपेक्षा जास्त विश्रांती घेतलेल्या डॉक्टरांनी कामात चांगली कामगिरी केली. शरीराला दिवसाला ८ तासांची झोप लागते. पुढील दिवसांत दोन तास झोप कमी करण्याची गरज तुम्हाला आहे. अशावेळी आधीच्या दिवसांतच ते दोन तास तुम्ही कर्ज म्हणून घ्यायला हवेत. जर तुम्ही आधीच झोप घेतली नाही तर एकाग्रतेचा अभाव आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल. अनेक जण आज झोप सोडूया, विकेंडला झोपूया असे म्हणतात. पण तज्ज्ञांच्या मते आठवड्याची संपूर्ण झोप विकेंडला घेण्यापेक्षा स्लीप बँकिंग चांगले आहे. स्लीप बँकिंग शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीला संतुलित ठेवते.
स्लीप बँकिंग हा फक्त अल्पकालीन उपाय आहे. तो चांगल्या झोपेचा पर्याय नाही. दररोज रात्री ७-९ तासांची नियमित, दर्जेदार झोप तुमचे ध्येय असायला हवे. अनिवार्य परिस्थितीतच हे पाळायला हवे.