
Kitchen Ant Control Tips: उन्हाळा सुरू झाला की किचनमध्ये मुंग्यांची रांग लागलेली दिसते. वाढलेलं तापमान आणि अन्नाच्या वासामुळे मुंग्या लगेच आकर्षित होतात. विशेषतः गोड पदार्थ, उघड्यावर ठेवलेलं अन्न आणि ओलसर जागा त्यांना खूप आवडतात. वेळीच लक्ष दिलं नाही, तर त्या संपूर्ण किचनमध्ये पसरतात आणि आपली डोकेदुखी वाढवतात.
मुंग्यांना पळवून लावण्यासाठी मीठ आणि हळद हा शतकानुशतके वापरला जाणारा उपाय आहे. जिथे मुंग्या दिसतात, त्या ठिकाणी थोडं मीठ किंवा हळद भुरभुरा. यामुळे त्यांची वाट तुटते आणि त्या पुढे जात नाहीत. भिंतीतील भेगा आणि कोपऱ्यांमध्ये हा उपाय विशेष प्रभावी ठरतो.
मुंग्यांना घालवण्यासाठी लिंबू आणि व्हिनेगर हे खूप प्रभावी घरगुती उपाय आहेत. किचनचे कोपरे, खिडक्या आणि दारांवर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर स्प्रे करा. यांच्या तीव्र वासामुळे मुंग्या दूर राहतात आणि त्या ठिकाणी परत येत नाहीत. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.
मुंग्यांना लवंग आणि दालचिनीचा तीव्र वास अजिबात आवडत नाही. किचनमध्ये हे मसाले ठेवल्यास मुंग्या दूर राहतात. तुम्ही हवं असल्यास, यांची पूड करूनही वापरू शकता. हा उपाय नैसर्गिक तर आहेच, पण त्यामुळे किचनमध्ये छान सुगंधही दरवळतो.
मुंग्यांना रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे किचन स्वच्छ ठेवणं. अन्नपदार्थ नेहमी हवाबंद डब्यात (airtight containers) ठेवा आणि रोज किचनचा ओटा पुसून घ्या. जर कोणताही पदार्थ किंवा गोड वस्तू सांडली, तर ती लगेच स्वच्छ करा. यामुळे मुंग्यांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी दूर होतील आणि तुमचं किचन स्वच्छ राहील.