
मुंबई : बहुतेक कुटुंबांमध्ये प्रॉपर्टीची किंवा इतर महत्त्वाचे कागदपत्रं कुठे ठेवले आहेत, हे सगळ्यांना माहीत असतं. पण, घरात आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या व्यक्तीचे बँक अकाऊंट, गुंतवणूक, इन्शुरन्स पॉलिसी याबद्दल माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एरवी ही गोष्ट मोठी वाटत नाही, पण अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा ती व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहतं. अशावेळी मालमत्ता हस्तांतरण आणि इतर गोष्टींमध्ये अडचण येऊ नये, यासाठी आपण काळजी घ्यायला हवी.
तुमचे पासवर्ड किंवा बँकेचे पिन नंबर सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. पण तुमची खाती कोणत्या बँकेत आहेत, त्यात किती पैसे आहेत आणि काही कर्ज आहे का, याची माहिती तुमच्या जोडीदाराला किंवा घरातल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला नक्की देऊन ठेवा.
शेअर्स, बाँड्स आणि म्युच्युअल फंडातली गुंतवणूक कुटुंबाला माहीत नसेल, तर हे पैसे कायमचे अडकून पडू शकतात. त्यामुळे या गुंतवणुकीची माहिती व्यवस्थित लिहून ठेवा. सेबीच्या (SEBI) नव्या नियमांनुसार, आता डिमॅट अकाऊंट आणि म्युच्युअल फंडांमध्ये नॉमिनी जोडणं खूप सोपं झालं आहे.
नोकरी बदलताना जुन्या कंपनीकडील ईपीएफची माहिती आणि यूएएन (UAN) नंबर व्यवस्थित नोंदवून ठेवा. १ जुलै २०२६ पासून लागू झालेल्या नव्या ईपीएफ योजनेनुसार, नॉमिनेशन आणि क्लेम प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे ईपीएफमधील नॉमिनेशनची माहिती वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे.
लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचं नाव, कंपनीचं नाव, पॉलिसी नंबर, विम्याची रक्कम आणि प्रीमियम भरल्याची माहिती एकाच ठिकाणी लिहून ठेवा. विमा आहे हे माहीत असूनही, त्याची कागदपत्रं वेळेवर मिळाली नाहीत, तर पैसे क्लेम करणं अशक्य होऊन बसतं. याचसोबत हेल्थ इन्शुरन्सची माहितीही जपून ठेवा.
घेतलेलं होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत नाही. कुटुंबावर कोणती कर्जं आहेत आणि त्याचे हप्ते (EMI) कोणत्या खात्यातून जातात, याची स्पष्ट कल्पना घरातल्यांना असायला हवी.
पोस्ट ऑफिसमधील बचत, पीपीएफ (PPF), एनपीएस (NPS), कॉर्पोरेट डिपॉझिट्स आणि जॉइंट गुंतवणुकीचीही नोंद ठेवा. प्रत्येक संस्थेचं नाव, खात्याचा प्रकार, नॉमिनी कोण आहे आणि कागदपत्रं कुठे ठेवली आहेत, याची एक 'फॅमिली फायनान्शियल इन्व्हेंटरी' तयार करणं खूप फायद्याचं ठरतं.
पासवर्ड कुणालाही देऊ नका - फक्त कागदपत्रं आणि खात्याची माहिती कुठे आहे, तेवढंच कुटुंबाला सांगा. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर सिस्टम किंवा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.
नॉमिनेशन अपडेट करा - लग्न, घटस्फोट, मुलाचा जन्म किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू यांसारख्या मोठ्या बदलानंतर नॉमिनेशनची माहिती अपडेट करायला विसरू नका.
या सगळ्याचा उद्देश तुमच्या पैशांवरचा ताबा दुसऱ्याला देणं हा नाही, तर तुमच्यामागे तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची खात्री करणं हा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.