
मुंबई : सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सने वाढता खर्च, कमी झालेली विक्री आणि नफ्यात घट या कारणांमुळे कर्मचारी कपात सुरू केली आहे. कंपनीचा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय सध्या मोठ्या दबावाखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत टेलिव्हिजन आणि होम अप्लायन्स विभागातील सुमारे ८० ते १०० अधिकाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीच्या मुख्यालयातील संचालक स्तरावरील अधिकारी, टीम लीड्स आणि देशभरातील शाखा व एरिया मॅनेजर्सचा समावेश आहे, असं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इकॉनॉमिक टाइम्सला सांगितलं की, "इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातील सेल्स आणि मार्केटिंग टीममधील २५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. यात एजन्सीमार्फत कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे."
सॅमसंग इंडियाच्या देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सेल्स विभागात सुमारे ५५०-६०० अधिकारी आहेत. स्मार्टफोन विक्री सांभाळणारी टीम यापेक्षा खूप मोठी आहे. नोकरी गमावलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून दररोज थोड्या-थोड्या लोकांना कामावरून कमी केल्याची पत्रं दिली जात आहेत. अनेकांना तर नोटीस पीरियड पूर्ण न करताच तातडीने कामावरून कमी करण्यात आलं आहे.कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेज म्हणून तीन महिन्यांचा पगार आणि नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जात आहे.
आर्थिक वर्ष २६ (FY26) पर्यंत रुपयाच्या किमतीत जवळपास १०% घसरण झाली, ज्यामुळे सॅमसंगच्या अडचणी आणखी वाढल्या. या आर्थिक वर्षात रुपया स्थिर असला तरी, आधीच्या घसरणीचा फटका कंपनीला बसत आहे. कमकुवत रुपयामुळे सॅमसंगचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग झाल्या आहेत, ज्यामुळे विक्री वाढीवर अतिरिक्त दबाव आला आहे.संपूर्ण भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योग सध्या विक्री आणि नफ्यातील घसरणीचा सामना करत आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत वर्षभरात ११-१२% घट झाली आहे.
सॅमसंग इंडियासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे, कारण कंपनीच्या एकूण कमाईपैकी जवळपास तीन चतुर्थांश हिस्सा मोबाईल फोन विक्रीतून येतो.दरम्यान, यावर्षी एअर कंडिशनरच्या बाजारात जोर लावूनही सॅमसंगला फारसं यश मिळालेलं नाही. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायावरील दबाव आणखी वाढला आहे.
खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सॅमसंग आपल्या शाखांच्या नेटवर्कमध्येही बदल करत आहे. अनेक कार्यालये एकमेकांमध्ये विलीन केली जात आहेत, ज्यात रांची आणि पाटणा, दिल्ली आणि गुडगाव, तसेच पंजाब आणि चंदीगड येथील कार्यालयांचा समावेश आहे. या पुनर्रचनेमुळे काही पदं अनावश्यक ठरली आहेत, असं उद्योग क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
या मोठ्या कर्मचारी कपातीतून सॅमसंगच्या स्मार्टफोन विभागाला सध्या वगळण्यात आले आहे.मोबाईल व्यवसाय हा भारतात सॅमसंगसाठी सर्वाधिक कमाई करणारा विभाग आहे. त्यामुळे स्मार्टफोन विक्रीत सुधारणा होणं कंपनीच्या एकूण कामगिरीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
सॅमसंगच्या नवीन सुपर-प्रीमियम गॅलेक्सी फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण, १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे फोन एकूण स्मार्टफोन बाजारात फक्त ४% आहेत. त्यामुळे प्रीमियम सेगमेंटचा कंपनीच्या एकूण स्थितीवर मर्यादित परिणाम होतो.
मार्केट ट्रॅकर काउंटरपॉइंट रिसर्चच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून या तिमाहीत सॅमसंग भारतीय स्मार्टफोन बाजारात पिछाडीवर गेली आहे. सॅमसंग दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली, तर विवोने पहिलं आणि ओप्पोने दुसरं स्थान पटकावलं आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या मते, सॅमसंग अनेक प्रमुख स्मार्टफोन मॉडेल्सवर आक्रमक जाहिरातबाजी आणि ऑफर्सवर अवलंबून आहे.
कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सादर केलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २५ (FY25) मध्ये सॅमसंग इंडियाचा एकूण महसूल १.१ लाख कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत १२% जास्त आहे.
यामध्ये होम अप्लायन्सेसचा वाटा ११% होता, ज्यामुळे मोबाईल फोननंतर हा सॅमसंग इंडियाचा दुसरा सर्वात मोठा व्यवसाय ठरला.
कंपनीने आर्थिक वर्ष २५ मध्ये ११,२८७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील आर्थिक वर्षापेक्षा ३८% जास्त होता. आर्थिक वर्ष २६ चे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
मात्र, जूनच्या तिमाहीत सॅमसंगच्या जागतिक मोबाईल व्यवसायालाही तोटा सहन करावा लागला. मेमरी चिप्सच्या मजबूत मागणीमुळे सेमीकंडक्टर व्यवसायात नफा वाढला असला तरी, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय दबावाखालीच राहिला.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या होम अप्लायन्स आणि टेलिव्हिजन व्यवसायात कर्मचारी कपात होत आहे. दिवाळीनंतर दुसरी फेरी होऊ शकते."
ते पुढे म्हणाले, "मोबाईल फोन व्यवसायात तूर्तास कोणतीही नोकरकपात होणार नाही, कारण हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे आणि दिवाळीत विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. पण, नंतर या विभागाचाही आढावा घेतला जाऊ शकतो."
सॅमसंगने सोमवारी काही स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमती ५-१०% ने वाढवल्या आहेत. या महिन्यात कंपनीने केलेली ही तिसरी दरवाढ आहे.
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे ग्राहकांची दुकानांमधील गर्दी ४०% ने कमी झाली आहे. यामुळे स्मार्टफोन उत्पादक आणि विक्रेत्यांसमोर अनिश्चिततेचे नवीन संकट उभे राहिले आहे.
सॅमसंग इंडियाने आपल्या होम अप्लायन्स आणि टेलिव्हिजन विक्री टीमच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव डिसेंबर तिमाहीपर्यंत पुढे ढकलला आहे.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, या पुनर्रचनेमुळे सॅमसंगला खर्च कमी करण्यास आणि व्यवस्थापन सुलभ करण्यास मदत होईल. मात्र, एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावित विलीनीकरण सध्या पुढे ढकलण्यात आले आहे.