Sam Altman वॉशिंग्टन: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपलं काम, शिक्षण आणि व्यवसाय करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल, अशी चर्चा नेहमीच होत असते. पण OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी एक वेगळाच विचार मांडला आहे. त्यांच्या मते, भविष्यात AI हे काही फार मोठं किंवा गुंतागुंतीचं तंत्रज्ञान राहणार नाही, तर ते वीजेसारखी एक सामान्य आणि रोजच्या वापरातली सेवा बनेल.
वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या 'ब्लॅकरॉक यूएस इन्फ्रास्ट्रक्चर समिट'मध्ये बोलताना सॅम ऑल्टमन यांनी AI च्या भविष्याबद्दलचं आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, भविष्यात लोक AI बद्दल फार विचार करणार नाहीत, तर गरज असेल तेव्हा सहजपणे वापरतील. जसं आपण घरात लाईट किंवा पाणी वापरतो, अगदी तसंच. महत्त्वाचं म्हणजे, युझर्सना AI वापरल्याच्या मोजमापानुसारच पैसे द्यावे लागतील.
सोप्या भाषेत सांगायचं तर, AI द्वारे मिळणारी 'बुद्धिमत्ता' ही एक 'मीटर'वर चालणारी सेवा बनेल, असं ऑल्टमन यांना म्हणायचं आहे. सध्या अनेक AI सेवांसाठी एक ठराविक सबस्क्रिप्शन फी घेतली जाते. पण भविष्यात तुम्ही जेवढी कॉम्प्युटिंग क्षमता वापराल, तेवढंच बिल तुम्हाला येईल. AI टूल्स आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहेत. विशेषतः सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, इंजिनिअर्सना जे कोडिंगचं काम करायला कित्येक तास लागायचे, तेच काम AI सिस्टीम काही मिनिटांत पूर्ण करत असल्याचं ऑल्टमन यांनी नमूद केलं.
कोडिंगशिवाय संशोधन, विज्ञान आणि इतर ज्ञान-आधारित कामांमध्येही AI मोठी मदत करत आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी आता थेट तांत्रिक काम करण्याऐवजी AI सिस्टीमला मार्गदर्शन करण्यात जास्त वेळ घालवत आहेत. येत्या काळात हा ट्रेंड आणखी वाढेल, असंही ऑल्टमन म्हणाले. सध्या काही तासांची कामं करणारी AI सिस्टीम भविष्यात काही दिवस किंवा आठवडे लागणारे मोठे प्रोजेक्ट्सही हाताळू शकेल, अशी त्यांना आशा आहे.
मात्र, हे भविष्य प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची गरज आहे. शक्तिशाली AI मॉडेल्स चालवण्यासाठी मोठे डेटा सेंटर्स, विशेष हार्डवेअर आणि प्रचंड विजेची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी OpenAI कंपनी ॲमेझॉन (Amazon), एनव्हिडिया (Nvidia) आणि सॉफ्टबँक (SoftBank) यांसारख्या कंपन्यांसोबत मिळून कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फक्त काही मोजक्या कंपन्यांपुरतं मर्यादित न राहता, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, हे सॅम ऑल्टमन यांचं मुख्य ध्येय आहे.