
मुंबई : बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मॉनेटरी पॉलिसीच्या निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या अपेक्षांना थोडा ब्रेक लावत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर वर कायम ठेवला आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे तुमच्या EMI मध्ये सध्या कोणतीही कपात होणार नाही. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, तुमचा EMI अखेर स्वस्त कधी होणार? केंद्रीय बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या भाषणात याचं थेट उत्तर मिळालं नसलं तरी, असे काही इशारे नक्कीच मिळाले आहेत, जे येणाऱ्या काही महिन्यांचं चित्र स्पष्ट करतात.
RBI च्या ६ सदस्यांच्या MPC (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ने एकमताने निर्णय घेतला की सध्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यानुसार, रेपो रेट ५.२५ टक्के, SDF रेट ५ टक्के, MSF रेट ५.५० टक्के आणि बँक रेट ५.५० टक्के ठेवण्यात आला आहे. हे चारही दर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत आणि बँकेची भूमिकाही ‘न्यूट्रल’ म्हणजे 'थांबा आणि वाट पाहा' अशी आहे.
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, सध्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पेट्रोल-डिझेलमुळे महागाईचा काटा थोडा वर आहे. RBI चा अंदाज आहे की, या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (Q3) म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान महागाई सर्वाधिक (५.९ टक्के) असेल आणि त्यानंतर ती हळूहळू खाली यायला सुरुवात होईल. जर येत्या काही महिन्यांत महागाई अपेक्षेपेक्षा कमी राहिली आणि जागतिक परिस्थिती सुधारली, तर RBI कडे भविष्यात व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यासाठी अधिक वाव असेल. म्हणजेच, जर सगळं काही ठीक राहिलं तर या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी (२०२७) च्या सुरुवातीला तुम्हाला स्वस्त EMI चं गिफ्ट मिळू शकतं. अर्थात, याचा अंतिम निर्णय रिझर्व्ह बँकच घेईल.
अल निनोचा धोका
हवामानातील बदल आणि पावसाचं बिघडलेलं गणित (El Nino) यामुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात खाण्यापिण्याच्या वस्तू आणखी महाग होण्याचा धोका आहे.
जागतिक तणाव
जुलैच्या सुरुवातीपासूनच जगाच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः मिडल ईस्टमध्ये तणाव पुन्हा वाढला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये खूप वेगाने चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत RBI 'वेट अँड वॉच' मोडमध्येच राहू इच्छिते.
RBI च्या आजच्या निर्णयानुसार, सध्या स्थिरतेवर जास्त भर दिला जात आहे. याचा अर्थ असा की, सध्या कर्ज आणि EMI मध्ये लगेच कोणताही मोठा बदल दिसणार नाही. पण जर येत्या काही महिन्यांत महागाई नियंत्रणात राहिली, तर भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.