
मुंबई : तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि मोठा फंड तयार करायचा असेल, तर एक सरकारी अशी योजना आहे, ज्यात चांगले रिटर्न्स मिळतील. महत्त्वाचं म्हणजे एकत्रित जमवलेल्या रकमेवर दर महिन्याला व्याजही भरघोस मिळेल. कोणती आहे ही योजना?
सुरक्षित आणि चांगल्या रिटर्न्ससाठी पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड चांगला पर्याय आहे. या योजनेतून एकत्रित रकमेसह त्यावर व्याजही चांगलं मिळेल. यासाठी लहान का असेना पण शिस्तीने, दर महिन्याला गुंतवणूक करणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी १५+५+५ असा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरेल.
PPF वर किती व्याज मिळतं?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF या योजनेत वर्षाला सध्या ७.१ टक्के व्याज मिळतं. हे व्याज कंपाउंडिंग अर्थात चक्रवाढ व्याजाच्या आधारे मिळतं. चक्रवाढ व्याजाची हीच ताकद PPF गुंतवणुकीत मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करते. महत्त्वाची बाब म्हणजे यात मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते. या पीपीएफ योजने तुम्ही वर्षाला कमीत-कमी ५०० आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
१५+५+५ हा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो?
PPF योजनेत १५+५+५ मोठ्या कालवधीसाठी गुंतवणूक करता येते. पीपीएफचा मूळ कालावधी १५ वर्ष असतो. पण हा कालावधी पाच-पाच वर्षाच्या अंतराने वाढवताही येऊ शकतो. गुंतवणुकीतील मूळ १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन पर्याय मिळतात.
पहिला पर्याय -
पहिला पर्याय असा, की तुम्ही १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता.
दुसरा पर्याय -
१५ वर्ष झाल्यानंतर पैसे काढण्याऐवजी तुम्ही हा योजनेतील कालावधी ५ वर्षांसाठी वाढवू शकता. त्यानंतर आणखी ५ वर्षासाठी हा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे एकूण २५ वर्ष पैसे खात्यात ठेवू शकता.
तिसरा पर्याय -
- पीपीएफमध्ये दरवर्षी १.५ लाख गुंतवले, तर १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक पुढे वाढवता येईल.
- १५ वर्षानंतर पुढील ५ वर्षात कोणतीही गुंतवणूक न करता पैसे तसेच खात्यात ठेवता येतील.
- असे २० वर्ष होतील. पुढे आणखी ५ वर्ष त्यात वाढवली, तर २५ वर्षांत तुमची गुंतवणूक ८०.७७ लाख होईल. या काळात २३.४५ लाख व्याज मिळेल.
२५ वर्षात १.३ कोटींचा फंड तयार होईल -
- १५ वर्ष मूळ पीपीएफचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढे ५-५ अशी एकूण २५ वर्ष दरवर्षी १.५ लाख गुंतणवूक सुरू ठेवली, तर २५ वर्षात एकूण ३७.५ लाख जमा होतील.
- ७.१ टक्के व्याजाने २५ वर्षात ही रक्कम १.३ कोटी होईल.
- म्हणजेच २५ वर्षात एकूण ३७.५ लाख रुपयांच्या मूळ गुंतवणुकीवर ६५.५८ लाख रुपये व्याज मिळेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, आता केलेलं हे कॅल्क्युलेशन ७.१ टक्के व्याजदराने केलं आहे. पीपीएफचा व्याजदर वेळोवेळी बदलला जातो. त्यामुळे व्याजदर बदलल्यास एकूण रकमेत बदल होऊ शकतात.
२५ वर्षानंतर ६१ हजार रुपये महिन्याला कमाई -
- २५ वर्षात १.३ कोटी रक्कम जमा होईल. ही रक्कम न काढता खात्यातच ठेवली, तर त्यावर व्याज मिळत राहील.
- ७.१ टक्के व्याजाने १.३ कोटी रुपयांवर जवळपास ७.३१ लाख रुपये वर्षाला व्याज मिळेल.
- ७.३१ लाख रुपये १२ महिन्यांसाठी विभागले तर दर महिन्याला ६०,९४१ रुपये मिळतील.