
मुंबई : वनप्लसचा पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन 'वनप्लस 16' लवकरच लाँच होणार आहे. हा फोन सर्वात आधी चीनमध्ये येईल. कंपनीने याआधी काही माहिती दिली होती, पण आता या फोनचा कॅमेरा, चिपसेट आणि बॅटरीचे जवळपास सगळेच डिटेल्स लीक झाले आहेत. 'डिजिटल चॅट स्टेशन' या टिपस्टरने 'वेइबो'वर (Weibo) ही नवीन माहिती शेअर केली आहे, ज्याची टेक जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.
165Hz डिस्प्ले
वनप्लसने कन्फर्म केलंय की, त्यांचा पहिला 'कलरओएस 17' (ColorOS 17) वर चालणारा स्मार्टफोन वनप्लस 16 असणार आहे. यात 165Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. जुन्या वनप्लस 15 मध्येही 165Hz रिफ्रेश रेट होता, पण तो फक्त गेमिंगच्या वेळी काम करायचा. नॉर्मल युजमध्ये तो 120Hz वरच असायचा. पण नव्या वनप्लस 16 मध्ये तुम्ही रोजच्या वापरावेळीही 165Hz रिफ्रेश रेटचा अनुभव घेऊ शकाल.
गेमिंगसाठी 185Hz रिफ्रेश रेट
डिजिटल चॅट स्टेशनच्या रिपोर्टनुसार, वनप्लस 16 मध्ये 'बीओई एक्स4' (BOE X4) डिस्प्ले वापरला जाईल. नॉर्मल युजमध्ये 165Hz रिफ्रेश रेट मिळेल, पण गेमिंगच्या वेळी हा रेट चक्क 185Hz पर्यंत जाऊ शकतो.
9000mAh ची तगडी बॅटरी
वनप्लस 16 चं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याची भलीमोठी बॅटरी. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, या फोनमध्ये 9000mAh ची बॅटरी असेल. याची रेटेड कॅपॅसिटी 8780mAh असू शकते. यात 100 वॅटचं वायर्ड चार्जिंग आणि 50 वॅटचं वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतं. याशिवाय, यात ड्युअल-सेल बॅटरी सिस्टीम वापरली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
200 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा
कॅमेरा डिपार्टमेंटमध्येही वनप्लस मोठा बदल करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 1/1.4 इंच सेन्सरसोबत 200 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा असेल. यासोबतच 50 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 1/1.95 इंच सेन्सर असलेला 50 मेगापिक्सल्सचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेराही दिला जाऊ शकतो. अर्थात, कॅमेऱ्याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 प्रो
दमदार परफॉर्मन्ससाठी वनप्लस 16 मध्ये क्वालकॉमचा 'स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 प्रो' (Snapdragon 8 Elite Gen 6 Pro) चिपसेट दिला जाऊ शकतो. टीएसएमसीच्या (TSMC) 2 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर हा चिपसेट बनवला जात असल्याचं समजतंय. यात 2+3+3 कोर सेटअपसह ऑक्टा-कोर सीपीयू आणि ॲड्रेनो 850 (Adreno 850) जीपीयू असू शकतो.
स्लिम बेझल्स
लीक झालेल्या डिझाईनच्या माहितीनुसार, वनप्लस 16 चे बेझल्स आधीपेक्षा खूपच स्लिम असतील. यामुळे डिस्प्ले पाहण्याचा अनुभव आणखी भारी होईल. पण फोनची डिझाईन किंवा लाँचिंगच्या तारखेबाबत वनप्लसने अजून मौन बाळगलं आहे.
ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लाँचिंगची शक्यता
सध्याच्या रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर 2026 मध्ये वनप्लस 16 चीनमध्ये लाँच होऊ शकतो. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करेल. लाँचची तारीख आणि इतर फीचर्ससाठी आता वनप्लसच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.