
NHAI Increases FASTag Annual Pass Price : तुम्ही जर नेहमी हायवे किंवा एक्सप्रेसवेवरून प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशभरात टोल भरणं सोपं करणाऱ्या FASTag सेवेच्या वार्षिक पासची किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
National Highways Authority of India (NHAI) ने जाहीर केलंय की FASTag वार्षिक पासच्या किमतीत वाढ केली जात आहे. हे नवीन दर १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. आतापर्यंत हा पास ३,००० रुपयांना मिळत होता, पण आता त्यात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता हायवेवरून नियमित प्रवास करणाऱ्यांना FASTag वार्षिक पाससाठी ३,०७५ रुपये मोजावे लागतील.
FASTag वार्षिक पास हा एक प्रकारचा प्रीपेड टोल प्लॅन आहे. जे लोक सतत हायवेवरून प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही सोय सुरू करण्यात आली होती. हा पास घेतल्यावर प्रत्येक वेळी टोलसाठी वेगळे पैसे भरण्याची किंवा रिचार्ज करण्याची गरज नसते. एकदा पैसे भरल्यावर हा पास एक वर्ष किंवा २०० टोल ओलांडेपर्यंत वैध राहतो. यापैकी जी अट आधी पूर्ण होईल, तिथपर्यंत पास वापरता येतो.
सरकारच्या म्हणण्यानुसार, ही वाढ नियमांनुसारच केली आहे. Ministry of Road Transport and Highways (MoRTH) ने सांगितलं की, हा निर्णय 'नॅशनल हायवे फी नियम २००८' च्या तरतुदींनुसार घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, FASTag वार्षिक पासचा वापर वेगाने वाढत असून आतापर्यंत ५६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. वाढती मागणी आणि सिस्टीम चालवण्याचा खर्च लक्षात घेऊन किमतीत ही थोडी वाढ करण्यात आली आहे.
FASTag वार्षिक पास फक्त खाजगी वाहनांसाठी लागू आहे. यात प्रामुख्याने:
हा पास देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर असलेल्या सुमारे १,१५० टोल नाक्यांवर वैध असेल.
FASTag वार्षिक पास घेणाऱ्या प्रवाशांना अनेक फायदे मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे टोल नाक्यावर वारंवार थांबण्याची किंवा पैसे देण्याची गरज लागत नाही. सर्व टोल थेट FASTag मधून कापले जातात, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि प्रवासही सोपा होतो. शिवाय, टोल भरणं पूर्णपणे कॅशलेस होत असल्यामुळे लांब रांगांपासूनही सुटका मिळते.
FASTag वार्षिक पास खरेदी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. सर्वात आधी तुम्हाला Rajmarg Yatra ॲप डाउनलोड करावं लागेल किंवा NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर जावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची माहिती आणि FASTag ID टाकावा लागेल. तुमचा FASTag ॲक्टिव्ह आहे आणि गाडीला व्यवस्थित जोडलेला आहे, याची खात्री करा. तुम्ही UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरू शकता. पेमेंट पूर्ण होताच हा पास तुमच्या FASTag ID शी लिंक होईल आणि तुम्हाला SMS द्वारे याची माहिती मिळेल.