Artemis 2: तब्बल 54 वर्षांनी माणूस पुन्हा चंद्राच्या दिशेने; ऐतिहासिक मोहिमेवर चौघांची टीम!

Published : Apr 02, 2026, 10:27 AM IST
NASA Artemis 2 Mission Launches Four Astronauts on Historic Lunar Flyby

सार

Artemis 2 तब्बल 54 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर नासाची 'आर्टेमिस 2' मोहीम चार अंतराळवीरांना घेऊन चंद्राकडे झेपावली आहे. यामध्ये एक महिला आणि एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा समावेश असून, ही टीम दहा दिवसांत चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणार आहे.

फ्लोरिडा: तब्बल 54 वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर माणूस पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने निघाला आहे. नासाच्या 'आर्टेमिस 2' मोहिमेचं भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झालं. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून SLS नावाच्या महाकाय रॉकेटने चार अंतराळवीरांना घेऊन उड्डाण केलं. हे चौघं 'ओरायन' नावाच्या अंतराळयानातून प्रवास करत आहेत. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे, चंद्राकडे जाणाऱ्या टीममध्ये पहिल्यांदाच एका महिलेचा आणि एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा समावेश आहे. या टीममध्ये मिशन कमांडर रेड वाईसमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कोच आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे.

या मोहिमेचं मुख्य लक्ष्य दहा दिवसांत चंद्राला फेरी मारून पृथ्वीवर सुखरूप परत येणं आहे. या प्रवासात 'ओरायन' यान अशा ठिकाणी पोहोचेल, जिथे आजपर्यंत कोणतंही मानवी अंतराळयान गेलेलं नाही. प्रक्षेपणापूर्वी हे चारही अंतराळवीर केनेडी स्पेस सेंटरमध्ये खास क्वारंटाईनमध्ये होते. त्यांची झोप, जेवण आणि पाणी पिण्यावरही कडक नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. क्रिस्टिना कोच या चांद्र मोहिमेचा भाग बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत, तर व्हिक्टर ग्लोव्हर हे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. जेरेमी हॅन्सन हे पहिले गैर-अमेरिकन नागरिक आहेत जे चंद्राच्या मोहिमेवर जात आहेत. या चौघांच्या सोबतीला 'राईस' नावाची एक छोटी बाहुली आणि तब्बल 56 लाख लोकांची नावं असलेलं एक मेमरी कार्डही यानात ठेवण्यात आलं आहे.

1972 साली झालेल्या 'अपोलो 17' मोहिमेनंतर मानवाला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणारी ही पहिलीच मोहीम आहे. 'अपोलो 17' च्या टीमने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, पण 'आर्टेमिस 2' ची टीम चंद्रावर उतरणार नाही. ते फक्त चंद्राला प्रदक्षिणा घालून 10 दिवसांत परत येतील. याआधी 2022 च्या अखेरीस नासाने 'आर्टेमिस 1' ही मानवरहित मोहीम यशस्वी केली होती. त्यावेळी 'ओरायन' यानाने कोणत्याही प्रवाशाशिवाय चंद्राला यशस्वी प्रदक्षिणा घातली होती. चीनच्या आधी पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरवणं हे अमेरिकेचं मुख्य ध्येय आहे.

नवीन योजनेनुसार, 'आर्टेमिस 4' मोहिमेत माणूस पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवेल. पण हे सगळं 'आर्टेमिस 2' च्या यशावर अवलंबून आहे. लांबच्या अंतरावरील मानवी अंतराळ मोहिमांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता तपासावी लागेल. त्यासाठी 'आर्टेमिस 2' चं यशस्वी होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाचं लक्ष या चांद्रफेरीकडे लागलं आहे.

 

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

गृहकर्ज घेणाऱ्यांना धक्का! EMI १०,००० रुपयांपर्यंत वाढणार, मध्यमवर्गीयांनी कराव्यात या ५ गोष्टी
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव