मुंबई - २००६ मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातून जीवंत बचावलेले चिराग चौहान आजही लोकल ट्रेनचा उल्लेख ऐकताच भावूक होतात. सीए चौहान यांचे आयुष्य या स्फोटाने कायमचे बदलून टाकले. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवून दाखवलेच.
त्या स्फोटात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. या घटनेने त्यांच्या अनेक मित्र-नातेवाइकांमध्ये शोकाचं वातावरण निर्माण केलं, पण चिराग यांनी मात्र या प्रसंगाकडे आयुष्याच्या एका नव्या आणि अर्थपूर्ण प्रवासाच्या सुरुवातीसारखं पाहिलं. आज ते यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट असून स्वतःची कंपनीही चालवत आहेत.
"कधी कधी वाटतं ती ट्रेन चुकली असती तर..."
चौहान म्हणाले, "कधी कधी वाटतं की त्या दिवशी ती ट्रेन चुकली असती, पण मग लक्षात आलं की नियतीत जे लिहिलं आहे, ते घडणारच." त्या दिवशी त्यांनी नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर घर सोडलं होतं, ज्यामुळे ते त्या ट्रेनमध्ये गेले आणि बॉम्ब त्यांच्या केवळ दोन-तीन फुटांवरच होता.
25
१५ मिनिटांत सात स्फोट
खार आणि सांताक्रूज स्टेशनदरम्यान बॉम्बस्फोट झाला. त्या स्फोटांत अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले. पण चिराग सुदैवाने बचावले. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ११ जुलै २००६ रोजी फक्त १५ मिनिटांत सात ठिकाणी स्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले.
ट्रेनची आठवण अजूनही मनात ताजी
दोन दशके झाली तरी मुंबई लोकल ट्रेनची धडधड आजही चिराग यांच्या आठवणीत ताजी आहे. "लोकल ट्रेनमधील प्रवास, ब्रेक लागल्यावर होणारा आवाज, दरवाजे जोरात बंद होणं आणि गर्दीत जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ हे सगळं आजही डोळ्यांसमोर तसंच आहे," असं त्यांनी सांगितलं.
35
"काश! मी पुन्हा ट्रेनने प्रवास करू शकलो असतो"
चिराग म्हणाले, "काश! मी पुन्हा लोकल ट्रेनने प्रवास करू शकलो असतो." त्यांच्यासाठी हा प्रवास केवळ भीतीवर मात करण्याचा नाही, तर जुन्या आठवणींना पुन्हा अनुभवण्याचा असतो. त्यांनी सांगितलं की त्यांना 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये प्रवास करायची इच्छा आहे, कारण ती अधिक आरामदायक आहे, असं त्यांनी ऐकलं आहे. "मला संधी मिळाली, तर मी नक्की वंदे भारतमध्ये प्रवास करेन," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
45
नवीन प्रवासाची सुरुवात
२००९ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मुंबईतील एका सभेत सन्मान केला होता. "तो क्षण माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा होता," असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी खासगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित केलं. चिराग यांनी एक आंतरराष्ट्रीय बँक व कंपनीत काम केलं असून आता स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप आणि इतर उपक्रमांच्या व्यवस्थापनात ते व्यस्त आहेत.
55
स्फोटाच्या दु:खातून यशाच्या शिखराकडे झेप
एका भयानक दुर्घटनेतून वाचून चिराग चौहान यांनी केवळ स्वतःचं आयुष्य नव्याने उभं केलं नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायक ठरले. अपंगत्वावर मात करत त्यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि परिश्रमांच्या बळावर यशाचा नवा अध्याय लिहिला आहे.
मुंबईसारख्या धावत्या शहरात, चिराग यांची कथा आपल्याला आठवण करून देते की संकटांवर मात करूनही स्वप्नं पाहता येतात आणि ती प्रत्यक्षातही उतरवता येतात.