
नवी दिल्ली : एका आईने मुलासाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. स्निग्धा असं तिचं नाव. तिने मुलासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तिची ९-५ ची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि स्वतःचा होमस्टे बिझनेस सुरू केला. तिने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. २०२३ मध्ये नोकरी सोडताना तिच्याकडे पुढे काय करायचं याचा कोणताही स्पष्ट प्लॅन नव्हता. पण आज ती तिच्या या 'शॉर्ट-टर्म रेंटल' व्यवसायातून २१ लाख रुपये कमावत असल्याचा दावा करते. दिल्लीतील तिच्या काही प्रॉपर्टीज ती Airbnb च्या माध्यमातून भाड्याने देते.
स्निग्धा सांगते की, नोकरी सोडण्यामागे करिअर नाही, तर तिचा मुलगा हे प्रमुख कारण होतं. त्यावेळी तिचा मुलगा 'सेपरेशन एंग्झायटी'चा (आईपासून दूर होण्याची भीती) सामना करत होता. ती म्हणते, "रोज सकाळी कामावर जाताना मला अपराधी वाटायचं. मी माझ्या करिअरला मुलापेक्षा जास्त महत्त्व देतेय का, असा प्रश्न पडायचा." पण नोकरी सोडल्यावर पुढे काय करायचं, याची तिला काहीच कल्पना नव्हती. Airbnb वर ती राहिली होती, पण होमस्टे कसा चालवायचा याचा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला मनात भीती आणि स्वतःबद्दल शंका होती. तरीही, तिने या क्षेत्राबद्दल माहिती गोळा केली, अभ्यास केला आणि मगच या नवीन प्रवासाला सुरुवात केली.
पण व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या पहिल्या बुकिंगने तिचा आत्मविश्वास परत आणला. ती म्हणते, "ते बुकिंग माझ्यासाठी फक्त एक सामान्य रिझर्वेशन नव्हतं, तर मी हा व्यवसाय यशस्वी करू शकते याचा पुरावा होता." हळूहळू तिच्या मनातील भीती आत्मविश्वासात बदलली. व्यवसाय वाढल्यामुळे तिला फिरायला आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला मिळू लागला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कामावरून घरी येण्याची वाट तिचा मुलगा पाहत बसायचा, ही परिस्थिती आता बदलली होती. आता काम करताना तिचा मुलगा तिच्यासोबतच असतो, हे स्वातंत्र्य तिला मिळालं आहे, असं स्निग्धा सांगते.