
मुंबई : भारतातील मोबाईल रिचार्जचे दर आणखी वाढायला हवेत, असं भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांनी म्हटलं आहे. टेलिकॉम सेवांसाठी एका ग्राहकाने दरमहा सरासरी ३५० रुपये तरी खर्च करायला हवेत, असं त्यांचं मत आहे. पेप्सीची बाटली आणि चिप्सच्या पुड्यावर जेवढे पैसे खर्च होतात, त्यापेक्षा कमी दरात सध्या मोबाईल सेवा मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
भारती एंटरप्रायझेसच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मित्तल यांनी ही गोष्ट स्पष्ट केली. आजकाल बँकिंग, शिक्षण, मनोरंजन अशा अनेक कामांसाठी मोबाईल फोन हे मुख्य साधन बनलं आहे. सरकारी सेवांसह बऱ्याच गोष्टींसाठी मोबाईल कनेक्शन गरजेचं आहे. असं असूनही, भारतात टेलिकॉम सेवांसाठी आकारले जाणारे दर खूप कमी आहेत, असा त्यांचा अंदाज आहे.
महिन्याला ३५० रुपये हिशोब केला, तर एका दिवसाचा खर्च फक्त १० ते १२ रुपये येतो. मिळणाऱ्या सेवांचा विस्तार पाहता हा खर्च योग्य आहे, असं मित्तल म्हणाले. साबण, चिप्स यांसारख्या वस्तूंवर ग्राहक किती पैसे खर्च करतात हे सर्वांना माहीत आहे. एका पेप्सीच्या बाटलीसाठीही त्याहून जास्त पैसे मोजावे लागतात, असं त्यांनी सांगितलं.
बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट, शिक्षण, थेट लाभ हस्तांतरण आणि आरोग्यविषयक रेकॉर्ड्स यासोबतच इन्स्टाग्राम, यूट्यूब सारखे मनोरंजन प्लॅटफॉर्मही मोबाईल इंटरनेटद्वारे मिळतात. दहा वर्षांपूर्वी मित्तल यांनी महिन्याला सरासरी ३०० रुपये दराची सूचना केली होती. पण महागाई आणि टेलिकॉम क्षेत्रातील कामकाजाचा वाढलेला खर्च पाहता, ती रक्कम आता पुरेशी नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
इंधन, वीज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्रशासकीय खर्च यात मोठी वाढ झाली असल्याचं मित्तल यांनी सांगितलं. देशात टेलिकॉम पायाभूत सुविधांचा आणखी विकास करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. चीनमध्ये १० लाखांहून जास्त मोबाईल टॉवर्स आहेत, तर भारतात फक्त सुमारे ३.५ लाख टॉवर्स आहेत. भारतातील टॉवर नेटवर्क किमान दुप्पट करायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे. फायबर कनेक्टिव्हिटी आणि समुद्राखालून जाणाऱ्या केबल नेटवर्कच्या विकासासाठीही मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे.
५जी सेवांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी खूप गुंतवणूक केली असली, तरी अपेक्षेइतकं उत्पन्न मिळालेलं नाही, असंही ते म्हणाले. स्पेक्ट्रम खरेदीसाठी लाखो कोटी रुपये खर्च झाले, तर नेटवर्कच्या विकासासाठी आणखी सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
महिन्याला सरासरी ३५० रुपये महसूल मिळवण्याचं लक्ष्य टेलिकॉम क्षेत्र कधी गाठणार, यावर मित्तल यांनी कोणतीही ठराविक वेळ दिलेली नाही. या प्रश्नावर त्यांनी 'माहित नाही' असं उत्तर दिलं. देशातील टेलिकॉम कंपन्यांनी जून २०२४ मध्ये शेवटची मोठी दरवाढ केली होती. तेव्हा १० ते २५ टक्क्यांपर्यंत दर वाढवले होते. २०१९ पासून आतापर्यंत तीन मोठ्या दरवाढी झाल्या आहेत. सप्टेंबर तिमाहीत एअरटेलला एका ग्राहकाकडून मिळणारा सरासरी मासिक महसूल २७१ रुपये होता. गेल्या वर्षी याच काळात तो २५६ रुपये होता. ३५० रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याच्या दरात सुमारे २९ टक्के वाढ करावी लागेल.
भारतात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या तीन खाजगी टेलिकॉम कंपन्या असणं आवश्यक आहे, असंही मित्तल म्हणाले. व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सध्या अडचणीत असताना, कंपन्यांचं आर्थिक आरोग्य टिकवणं महत्त्वाचं आहे. पूर्वी दहाहून अधिक कंपन्या बाजारात होत्या, त्यामुळे टेलिकॉम पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीवर वाईट परिणाम झाला होता, असंही त्यांनी जोडलं.