मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार वॅगनआर नव्या रूपात आणणार आहे. जबरदस्त लूक आणि रेकॉर्डब्रेक मायलेजसह येणाऱ्या या कारची किंमत सध्याच्या मॉडेलइतकीच असण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकीच्या वॅगनआरला बाजारात मोठी मागणी आहे. कुटुंबासाठी पुरेशी जागा, शहरात चालवण्यासाठी सोयीस्कर आकार, कमी मेन्टेनन्स खर्च आणि चांगलं मायलेज, यांमुळे ही कार अनेक वर्षांपासून भारतीयांची मनं जिंकत आहे. आता हीच लोकप्रिय हॅचबॅक पुन्हा एकदा नव्या रूपात बाजारात येणार आहे. ताज्या टेस्टिंगच्या माहितीनुसार, मारुती सुझुकी नव्या वॅगनआर फेसलिफ्टवर काम करत आहे. या नवीन मॉडेलमध्ये डिझाइनमध्ये काही बदलांसोबतच इंजिनमध्येही महत्त्वाचे अपडेट्स असू शकतात. विशेषतः, सध्याचं 1.2 लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन बदलून त्याजागी नवीन जनरेशनचं 1.2 लीटर तीन-सिलेंडर Z-सीरिज इंजिन आणलं जाऊ शकतं, अशी ऑटोमोबाईल क्षेत्रात चर्चा आहे. अर्थात, मारुती सुझुकीने अद्याप यावर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
सध्या भारतीय बाजारात विकली जाणारी वॅगनआर ही तिसऱ्या जनरेशनची मॉडेल आहे. ही कार 2019 मध्ये बाजारात आली होती. त्यानंतर 2022 आणि 2025 मध्ये डिझाइन, फीचर्स आणि पॉवरट्रेनमध्ये छोटे-छोटे अपडेट्स झाले, पण पूर्णपणे नवीन जनरेशन मॉडेल आलेलं नाही. आता मारुती सुझुकी या मॉडेलला फेसलिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. वॅगनआरची खास 'टॉल बॉय' ओळख कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, कारचं मूळ डिझाइन तसंच ठेवून पुढचा भाग, लायटिंग, इंटीरियर आणि फीचर्समध्ये बदल केले जाऊ शकतात. नव्या वॅगनआरमध्ये पुढच्या भागात मोठे बदल अपेक्षित आहेत. नवीन डिझाइनची ग्रिल, रीडिझाइन केलेले हेडलॅम्प आणि DRLs मुळे कारला अधिक मॉडर्न लूक मिळू शकतो. बंपरच्या डिझाइनमध्येही बदल दिसू शकतात. साईड प्रोफाइलमध्ये नवीन अलॉय व्हील्स आणि इतर छोटे डिझाइन बदल येऊ शकतात.
35
इंटीरियरमध्येही नवीन फीचर्स
बाहेरच्या बदलांसोबतच केबिनमध्येही अपडेट्स असतील. नवीन डॅशबोर्ड लेआउट, अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नवीन डिझाइन एलिमेंट्ससारखे बदल अपेक्षित आहेत. सध्याच्या वॅगनआरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ऑटो गिअर शिफ्टसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. नवीन व्हर्जनमध्ये कंपनी हे फीचर्स अधिक आधुनिक बनवू शकते. मात्र, कोणत्या व्हेरिएंटमध्ये कोणतं फीचर मिळेल, याची संपूर्ण माहिती मारुती सुझुकी अधिकृतपणे जाहीर करेल.
नव्या वॅगनआरमधील सर्वात मोठा बदल इंजिनमध्ये असू शकतो. सध्या वॅगनआरमध्ये 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल आणि 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनचे पर्याय आहेत. 1.0-लीटर इंजिनमध्ये CNG पर्यायही उपलब्ध आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार, नवीन फेसलिफ्टमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिनच्या जागी नवीन Z-सीरिज तीन-सिलेंडर युनिट दिलं जाऊ शकतं. हे Z-सीरिज इंजिन मारुती सुझुकी आधीच काही इतर मॉडेल्समध्ये वापरत आहे. कमी वजन आणि उत्तम मायलेज लक्षात घेऊन हा बदल केला जाऊ शकतो. सध्या वॅगनआर 1.0-लीटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 24.35 किमी/लीटर आणि AGS व्हेरिएंट 25.19 किमी/लीटर मायलेज देतं. तर 1.2-लीटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 23.56 किमी/लीटर आणि AGS व्हेरिएंट 24.43 किमी/लीटर मायलेज देतं. CNG व्हर्जन 33.47 किमी/किलो मायलेज देतं. नवीन इंजिनमुळे मायलेज आणखी वाढण्याची शक्यता आहे, पण अधिकृत आकडेवारी अजून आलेली नाही.
55
किंमत ४.९९ लाखांपेक्षा कमी असेल का?
नव्या वॅगनआर फेसलिफ्टच्या किंमतीबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सध्याच्या वॅगनआरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹4,98,900 आहे. म्हणजेच, सध्याचं मॉडेल 5 लाखांपेक्षा थोड्या कमी किमतीत उपलब्ध आहे. नवीन मॉडेलमध्ये डिझाइन, फीचर्स आणि इंजिनमधील बदलांमुळे कंपनी किंमत कशी ठरवते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या किमतीच्या आसपास राहिली, तर एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये वॅगनआरची पकड आणखी मजबूत होईल. ही कार कधी लाँच होणार याची तारीख कंपनीने जाहीर केलेली नाही.
टीप - सध्या उपलब्ध असलेली माहिती ही टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या गाड्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील रिपोर्ट्सवर आधारित आहे. नव्या वॅगनआरचे इंजिन, फीचर्स, मायलेज, किंमत आणि लाँचच्या तारखेबद्दलची अंतिम माहिती मारुती सुझुकी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतरच स्पष्ट होईल.