
Maruti XL6 भारतीय ग्राहकांमध्ये 7-सीटर गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये, मारुती सुझुकी अर्टिगाने सुमारे 18,000 युनिट्सच्या विक्रीसह या सेगमेंटमध्ये पहिलं स्थान मिळवलं. पण, मारुतीचीच दुसरी लोकप्रिय MPV असलेल्या XL6 ने मागणीच्या बाबतीत इतर अनेक मॉडेल्सना मागे टाकलं आहे. स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा आणि XUV700 सारख्या गाड्यांनाही XL6 च्या पुढे तग धरता आला नाही. या काळात मारुती सुझुकी XL6 च्या एकूण 3,633 युनिट्सची विक्री झाली. ही वाढ तब्बल 93 टक्के आहे. कारण गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये, फक्त 1,878 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. चला, या MPV चे फीचर्स, इंजिन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मारुती सुझुकी XL6 ला अर्टिगाचं एक प्रीमियम आणि मस्क्युलर व्हर्जन मानलं जातं. गाडीचा पुढचा लूक खूपच बोल्ड आहे. मोठी ग्रिल आणि LED हेडलाइट्समुळे तिला एक प्रीमियम SUV सारखा फील येतो. साईड प्रोफाईलमध्ये 16-इंचाचे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि प्लॅस्टिक क्लेडिंग आहे, ज्यामुळे गाडीला एक रफ अँड टफ लूक मिळतो. ही एक 6-सीटर कार असून आतून पूर्णपणे ब्लॅक इंटीरियर दिलं आहे, ज्यामुळे केबिनला एक क्लासी आणि मॉडर्न फील येतो.
फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसोबत स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. याच्या हाय-एंड मॉडेल्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. सुरक्षेचीही यात पूर्ण काळजी घेतली आहे. चार एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल होल्ड असिस्टसारखे आवश्यक फीचर्स सर्व मॉडेल्समध्ये स्टँडर्ड म्हणून दिले आहेत.
या गाडीत हायब्रीड टेक्नॉलॉजीसह 1.5-लिटर K15C पेट्रोल इंजिन आहे, जे 26 किमी पेक्षा जास्त मायलेज देतं. हे इंजिन सुमारे 102 bhp पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करतं. मायलेजच्या बाबतीत, ही गाडी पेट्रोलवर सुमारे 20.97 किमी/लिटर आणि CNG वर 26.32 किमी/किलो सरासरी मायलेज देते. मारुती XL6 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11.52 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.50 लाख रुपयांपर्यंत जाते.